• Sun. Jun 14th, 2026
    Beed News : कामावरून घरी आला, जेवण केलं अन् खोलीत गेला; काही तासांतच टिप्पर चालकाने टोकाचं पाऊल उचललं

    बीडच्या पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथे एका २३ वर्षीय टिप्पर चालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. रात्री ११ वाजता भावाने खोलीत पाहिल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेमुळे टेकाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    बीडच्या पाटोदा तालुक्यातील येवलवाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुनील जाधव, बीड: जिल्ह्यामध्ये सध्या आत्महत्येच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. अशीच एक हृदयद्रावक घटना पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथून समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुण चालकाने आपल्या राहत्या घरी लोखंडी अँगलला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना रात्री उशिरा घडली असून, यामुळे टेकाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुकिंदा आप्पाजी टेकाळे (वय २३ वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. मुकिंदा हा तरुण एका खाजगी खडी क्रेशरवर टिप्पर चालक म्हणून काम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. शुक्रवारी नेहमीप्रमाणे आपले काम संपवून तो रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घरी परतला. घरी आल्यावर त्याने सर्वांसोबत जेवण केले आणि तो आपल्या खोलीत झोपण्यासाठी निघून गेला. त्यावेळी कोणालाही शंका आली नाही की मुकिंदाच्या मनात काही वेगळेच विचार सुरू आहेत.

    भावाच्या समोर आला धक्कादायक प्रकार

    रात्री ११ वाजेच्या सुमारास मुकिंदाचा भाऊ काही कामासाठी त्याच्या खोलीत गेला असता, त्याला समोर दिसलेले दृश्य अत्यंत धक्कादायक होते. मुकिंदाने खोलीतील लोखंडी अँगलला गळफास घेतलेला होता. हे पाहून त्याच्या भावाने आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत मुकिंदाची प्राणज्योत मालवली होती. ऐन विशीत असलेल्या मुलाने असे टोकाचे पाऊल उचलल्याचे पाहून संपूर्ण गावात शोककळा पसरली.

    पोलीस तपास आणि अंत्यसंस्कार

    घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर मुकिंदाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी शोकाकुल वातावरणात येवलवाडी येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    Maharashtra TimesAdinath Maharaj : ‘जननेंद्रियाचा त्याग स्वतःहून केला, कोणाचाही काहीही त्रास नाही’; तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्रींचा खुलासा

    कारण अद्याप गुलदस्त्यात

    मुकिंदाने आत्महत्या का केली? याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. तो कामावरून आल्यावर शांत होता की चिंतेत, याबाबत पोलीस नातेवाईक चौकशी करत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास बीट अंमलदार गोरख मिसाळ हे करत आहेत. एका कष्टाळू तरुणाने अशा प्रकारे जीवन संपवल्याने ग्रामीण भागातील तरुणांच्या मानसिक आरोग्याचा आणि त्यांच्यावरील तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा