• Thu. Jun 18th, 2026

    Solapur Crime : सोलापुरात सामूहिक अत्याचाराच्या तक्रारीला धक्कादायक वळण; पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न फसला, तरुणीसह प्रियकर अटकेत

    Solapur Crime : सोलापुरात सामूहिक अत्याचाराच्या तक्रारीला धक्कादायक वळण; पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न फसला, तरुणीसह प्रियकर अटकेत

    सोलापूर शहरात सामूहिक बलात्काराच्या फिर्यादीमुळे खळबळ उडाली होती, मात्र पोलिस तपासात या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले. प्रियकराला वाचवण्यासाठी आणि साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी तरुणीनेच खोटा बनाव रचल्याचे उघड झाले.

    प्रियकराला वाचवण्यासाठी तरुणीने रचला सामूहिक अत्याचाराचा बनाव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर : सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक बलात्कार झाल्याची फिर्याद एका पंचवीस वर्षीय तरुणीने दिली होती.सामूहिक बलात्काराच्या फिर्यादीमुळे सोलापूर पोलीस प्रशासनातील सर्वच पोलीस अधिकारी व कर्मचारी तपासाला लागले होते. पोलिसांनी सर्व बाजूने तपास केला असता, या सामूहिक बलात्कार प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. पोलिस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्स्वतर माहिती दिली.प्रेयसीने प्रियकराला जुन्या गुन्ह्यातून वाचवण्यासाठी आणि साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी रचलेला हा सामूहिक ‘बलात्काराचा बनाव’ होता, खोटी फिर्याद देणाऱ्या संबंधित तरुणीवर पोलिसांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ज्या पोलिस ठाण्यात खोटी फिर्याद दिली होती, त्याच पोलिस ठाण्यात तरुणी आता आरोपी झाली आहे. त्या तरुणीच्या प्रियकराविरोधात देखील गुन्हा दाखल झाला आहे.

    डायल 112 वर कॉल करून सामूहिक अत्याचार झाल्याची तक्रार

    18 मार्च 2026 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका पंचवीस वर्षीय तरुणीने 112 या नंबरवर फोन करून आपल्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ हालचाली केल्या. तरुणीच्या फिर्यादीवरून चार संशयित तरुणांना ताब्यात घेतलं.18 मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सामूहिक बलात्कार झाल्याची नोंद झाल्या बरोबर सर्वच पोलीस अधिकारी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल होऊन तपास सुरू केला.तपासादरम्यान पोलिसांना या घटनेत अनेक विसंगती आढळून येत होत्या. पोलीस तपासात सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स (CDR) आणि वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच महिलेच्या मैत्रिणी आणि बहिणीची चौकशी केली असता बलात्काराची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच महिलेने हा सर्व प्रकार बनाव असल्याची कबुली दिली.

    Maharashtra TimesParbhani Crime : परभणीत दोन गटात तुंबळ हाणामारी, रागाच्या भरात स्वतःच्याच सहकाऱ्यावर दोनदा स्काॅर्पिओ घातली; व्हिडिओ समोर

    प्रियकराला वाचवण्यासाठी तरुणीची खोटी तक्रार

    संबंधित तरुणीच्या प्रियकरावर एका प्रकरणात 22 डिसेंबर 2023 रोजी गुन्हा दाखल झाला होता.अनेक दिवस प्रियकर न्यायालयीन कोठडीत होता. 18 सप्टेंबर 2025 रोजी त्याला उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. प्रियकराला 1 सप्टेंबर 2025 रोजी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधून जामीन मिळाला होता मात्र, प्रियकर विरोधात संबंधित फिर्यादीने सर्वोच्च न्यायालयात अपील करून त्याचा जामीन केला होता.या जुन्या प्रकरणातील फिर्यादी आणि साक्षीदारांवर दबाव आणून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी या प्रियकर-प्रेयसीने सामूहिक बलात्काराची खोटी कथा रचली. अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन दिली.

    प्रियकर आणि प्रेयसीला अटक

    विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.भारतीय न्याय संहितेच्या कलम 248, 217 व 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा