ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे आणि प्रचंड मोठे सामाजिक कार्य उभे करताना त्यांच्या संपूर्ण राजकारणात सामान्य माणूस हा कायम केंद्रस्थानी असायचा, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, “दत्ता मेघे यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात कायमच सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवूनच आयुष्यभर ते कार्यरत राहिले. त्यामुळेच एक लोकनेता अशी त्यांची प्रतिमा होती. विविध शैक्षणिक संस्था उभारून त्यांनी विदर्भातील तरुणांच्या शिक्षणाची सोय तर केलीच आणि या संस्थाही नावारूपाला आणल्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे एक मोठा आधार ज्येष्ठांना मिळाला.”
“दातृत्व हे दत्ताभाऊंचे वैशिष्ट्य होते. अनेक गरिबांवर त्यांनी मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या. एक आदर्श राजकारणी म्हणून त्यांची ख्याती होती. वर्धा, नागपूर-विदर्भातील विकासाच्या राजकारणात त्यांनी कधीही पक्षीय भेद आणला नाही. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सुद्धा त्यांचा सदैव पुढाकार असायचा. नव्या पिढीचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी भूमिका बजावली. म्हणूनच सर्वच राजकीय पक्षात त्यांचे चाहते आहेत, हेच त्यांच्या यशाचे गमक. माझे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. अनेक प्रश्नांवर वडिलकीच्या नात्याने ते मार्गदर्शन करायचे. त्यांच्या निधनाने माझी वैयक्तिक हानी झाली आहे. दत्ताभाऊंना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत”, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.
दत्ता मेघे हे सौम्य, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्वासाठी ओळखले जात होते. त्यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत लोकसभा खासदार म्हणून नागपूर, रामटेक आणि वर्धा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले. तसेच ते महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषदेचे सदस्यही होते. मंत्रीपदासह विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली होती. जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे आणि विकासकामांना प्राधान्य देणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती.
११ नोव्हेंबर १९३६ रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे त्यांचा जन्म झाला. साध्या पार्श्वभूमीतून पुढे येत त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर राजकारणात वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या मृदूभाषी स्वभावामुळे आणि समन्वयक वृत्तीमुळे ते सर्वपक्षीय नेत्यांमध्ये लोकप्रिय होते.
मेघे यांची राजकीय वाटचाल विविध टप्प्यांतून गेली. त्यांनी सुरुवात काँग्रेस पक्षातून केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत त्यांनी आपला प्रभाव वाढवला. पुढे बदलत्या राजकीय समीकरणांनुसार त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तेथेही सक्रिय भूमिका बजावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना राजकारणात संधी दिली होती, ही बाब विशेष उल्लेखनीय मानली जाते.
राजकारणासोबतच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले. ‘दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च’च्या माध्यमातून त्यांनी उच्च शिक्षणाला चालना दिली. त्यांच्या पुढाकारातून अनेक अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन महाविद्यालयांची स्थापना झाली. वर्धा येथे त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. तसेच त्यांनी उभारलेल्या रुग्णालयांमुळे सर्वसामान्यांना आरोग्यसेवा उपलब्ध झाली.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. विविध सामाजिक आणि विकासात्मक प्रकल्पांमध्ये दोघांचा समन्वय पाहायला मिळत असे. त्यांच्या निधनामुळे गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. दत्ता मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्यातून अनेक पिढ्या घडल्या असून शिक्षण व समाजसेवेतील त्यांचा ठसा कायम स्मरणात राहील. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, समर्थक आणि मोठा अनुयायी वर्ग आहे.
