• Mon. Jun 15th, 2026

    जैन समाजाची सेवा, त्याग व अहिंसेची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 21, 2026
    जैन समाजाची सेवा, त्याग व अहिंसेची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन – महासंवाद

    मुंबई, दि. २१ : जैन समाजाने समाजसेवा, दानधर्म, अहिंसा आणि त्याग या मूल्यांवर आधारित कार्यातून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. लोकभवन येथील दरबार हॉलमध्ये संपन्न झालेल्या ६४ व्या जैन दीक्षा समारंभप्रसंगी ते बोलत होते.

    या कार्यक्रमास राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, अध्यात्म परिवार ट्रस्टचे विश्वस्त व देणगीदार बाबूलालजी बन्साली, हितेंद्र माणेकजी, राजेश चंदन तसेच अध्यात्म परिवार ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते. 

    उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, जैन समाज देशभरात विविध माध्यमांतून समाजहिताचे कार्य करीत असून सेवा हीच जैन धर्माची ओळख आहे. ६४ जणांनी दीक्षा स्वीकारणे ही बाब अत्यंत प्रेरणादायी  असून, त्यातून संयम, साधेपणा आणि आध्यात्मिकतेचा संदेश समाजाला मिळतो. भगवान महावीरांनी दिलेला अहिंसा, अपरिग्रह आणि अनेकांतवादाचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले. संवाद, सहिष्णुता आणि सर्व जीवसृष्टीबद्दल करुणा या मूल्यांमधूनच शांतता आणि शाश्वततेचा मार्ग सापडू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    तमिळनाडू आणि जैन धर्म यांचे ऐतिहासिक नाते अधोरेखित करताना उपराष्ट्रपती श्री. राधाकृष्णन यांनी जैन समाजाने साहित्य, संस्कृती आणि ज्ञानसंवर्धन क्षेत्रात दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. जैन तत्त्वज्ञानातील जीवनमूल्ये आजच्या समाजासाठीही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

    जैन धर्माचा संदेश शांतता, संयम व समन्वयाचा  राज्यपाल जिष्णू देव वर्मा

    सध्याच्या जागतिक परिस्थितीत जैन धर्मातील मूल्ये मानवजातीला शांतता, समन्वय आणि संयमाचा मार्ग दाखवणारी असल्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी सांगितले. आधुनिक जीवनशैली अनेकदा ग्राहकतावाद आणि इच्छांच्या अखंड पाठपुराव्याला प्रोत्साहन देत असली, तरी भारतीय संस्कृतीने नेहमीच साधेपणा, संयम आणि आत्मत्याग यांना महत्त्व दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

    आजच्या भौतिकतावादी युगात विविध क्षेत्रांतील व्यक्ती दीक्षेचा मार्ग स्वीकारत आहेत, ही बाब विशेष प्रेरणादायी आहे. भगवान महावीरांच्या अध्यात्मिक पावलांवर चालत विविध जैन आचार्यांनी भारतीय संस्कृतीला चिरंतन मूल्यांनी समृद्ध केले, असे त्यांनी नमूद केले.

    प्राचीन मंदिरांच्या जतन व जीर्णोद्धारासाठी जैन समाजाने पुढाकार घ्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांच्या जतन आणि जीर्णोद्धारासाठी जैन समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जैन समाजाने ज्ञान संवर्धनाबरोबरच प्राचीन वारशाच्या जतनासाठीही महत्त्वपूर्ण योगदान द्यावे. जैन समाजाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करून ते म्हणाले, प्राचीन हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि मंदिरांच्या संरक्षणासाठी होत असलेले कार्य प्रेरणादायी आहे. सुमारे सात कोटी प्राचीन हस्तलिखितांचे जतन व संवर्धन तसेच प्राचीन जैन मंदिरांच्या संरक्षणाचे कार्य संस्थेकडून करण्यात आले.

    अहिंसा ही केवळ शारीरिक हिंसेपुरती मर्यादित नसून विचारांमध्येही हिंसा नसावी, हा संदेश जैन तत्त्वज्ञान देते. आजच्या भौतिक जीवनशैलीच्या युगात सर्वकाही सोडून दीक्षा घेणे हे अत्यंत मोठे आणि दृढ निश्चयाचे कार्य आहे. जैन समाजाने आपल्या कार्यातून देशासमोर एक आदर्श निर्माण केला असून, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीत मोठे योगदान देतानाच दान-पुण्याच्या क्षेत्रातही जैन समाज अग्रस्थानी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    या कार्यक्रमात जैन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

    भगवान महावीर यांच्या जन्मोत्सवानिमित्त – ‘अष्ट द्रव्य’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैन पूजा साहित्य प्रदर्शनास मान्यवरांनी यावेळी भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

    0000

    शैलजा पाटील/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed