• Sat. Aug 1st, 2026

    स्वातंत्र्यदिनी राज्यभर विक्रमी आरोग्य संस्थांचे लोकार्पण ; ग्रामीण आरोग्य सेवेला नवी ताकद मिळणार – मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 1, 2026
    स्वातंत्र्यदिनी राज्यभर विक्रमी आरोग्य संस्थांचे लोकार्पण ; ग्रामीण आरोग्य सेवेला नवी ताकद मिळणार – मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    मुंबई, दि. ०१: राज्यातील आरोग्य पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी ८० टक्क्यांहून अधिक बांधकामे पूर्ण झालेल्या आरोग्य संस्थांना युद्धपातळीवर कार्यान्वित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय, तसेच बांधकाम पूर्णत्वास येत असतानाच आवश्यक वैद्यकीय यंत्रसामग्री, फर्निचर, मनुष्यबळ आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या विभागाच्या निर्णयामुळे स्वातंत्र्यदिनी राज्यात प्रथमच मोठ्या संख्येने आरोग्य संस्थांचे लोकार्पण होत आहे.

    राज्यातील उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ट्रॉमा केअर युनिट, स्त्री रुग्णालय अशा विविध आरोग्य सुविधा नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहेत. राज्यातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आणि तातडीच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.

    जत, घनसावंगी, अंबड, बदलापूर, खर्डी, मोखाडा, डहाणू, सांगोला, कोंढाळ, ब्रह्मपुरी, वाडी (बु.), वाशीम, धुळे आदी ठिकाणांवरील आरोग्य संस्था उद्घाटनासाठी सज्ज आहेत. तसेच चंद्रपूर, धुळे, पुणे, जळगाव, बीड, छत्रपती संभाजीनगर, वाशीम, बुलढाणा आणि सोलापूर येथील विविध आरोग्य प्रकल्पही नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहेत. या प्रकल्पांमध्ये आधुनिक ट्रॉमा केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे.

    राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ब्लॉक सार्वजनिक आरोग्य युनिट्सची कामेही पूर्णत्वास आली आहेत. नागपूर, गडचिरोली, सांगली, सिंधुदुर्ग, नांदेड आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये नवीन आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या असून, आवश्यक उपकरणे, मनुष्यबळ आणि प्रशासकीय पूर्तता करण्यात आली आहे. सर्व संस्था कार्यान्वित होण्यासाठी सज्ज करण्यात आल्या आहेत.

    यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. अपघातग्रस्त, हृदयरुग्ण, माता-बालक तसेच आपत्कालीन रुग्णांना स्थानिक स्तरावरच अधिक गुणवत्तापूर्ण आणि वेळेवर उपचार मिळणार आहेत. याचबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांनाही अधिक सुसज्ज कार्यपरिसर उपलब्ध होणार आहे.

    याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. अनेक वर्षे विविध कारणांनी ज्या आरोग्य संस्थांची कामे रखडलेली होती व ज्यांची ८० टक्क्यांहून अधिक बांधकामे झाली आहेत, त्यांना प्राधान्याने पूर्णत्वास नेण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्या सर्व संस्था आधुनिक सुविधांसह नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहेत. पूर्णत्वास येत असलेल्या उर्वरित आरोग्य संस्थांचेही ‘आरोग्य संवाद’ यात्रेदरम्यान लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे.”

    स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होत असलेले हे विक्रमी लोकार्पण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला नवे बळ देणारे ठरणार असून, “सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा” हे राज्य शासनाचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साकार करण्याच्या दिशेने हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

    ००००

    दत्तात्रय कोकरे/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed