रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांना सहआरोपी करुन अटक करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. रुपाली पाटील यांनी चाकणकरांवर सडकून टीकादेखील केली आहे.
“महाराष्ट्रातील माता-भगिनींवर जे अन्याय, अत्याचार झाले त्याला कारणीभूत राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने अटक करावी. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार करण्याबाबत लवकरच निर्णय घेतील. कारण या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होत आहे. सरकारची बदनामी झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यायला सांगितला. आता पक्षाच्या अध्यक्षा देखील चाकणकरांचा राजीनामा घेतील. ही मागणी सर्व पदाधिकाऱ्यांची आहे”, असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.
‘तुमचे काय संबंध होते त्याचे पुरावे देणार’
“मी आरोप केलेले नाहीत, तर रुपाली चाकणकर यांच्या गुरुने महिलांचा शोषण केलं आहे, तर चाकणकर यांनी या भोंदू बाबाला पदाचा गैरवापर करुन मदत केली. ते मी जगासमोर आणलं आहे. ते मी कोर्टासमोर आणणार आहे. तुम्हाला कोणत्या नोटीस पाठवायच्या आहेत ते पाठवा. मी पुरावे देणार. तुमचे काय संबंध होते त्याचे पुरावे देणार. अशीच धमकी त्यांनी खबरादर पुढारीच्या पत्रकाराला दिली होती ज्यांनी या भोंदू बाबाचा भंडाफोड केला होता. त्याचवेळी ह्यांनी कारवाई केली असती तर आज एवढ्या महिला बळी पडल्या असत्या का?”, असा सवाल रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला.
‘तेव्हा कडक कारवाईचे आदेश का दिले नाहीत?’
“रुपाली चाकणकर यांचा 2016 पासून अशोक खरात हा गुरुमाऊली आहे. त्या 2016 पासून त्यांची छत्री धरतात, पाय धरतात, अजून केक खायला घालतात. आम्हाला अडचण नाही. पण वर्षभरापूर्वी या भोंदू बाबाचा भंडाफोड झाला तेव्हा त्यांनी या भोंदूबाबावर कारवाई का नाही केली? तेव्हा तर तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर होता. तेव्हा तु्म्हीला पोलिसांना कडक कारवाईचे आदेश का नाही दिले?”, असादेखील सवाल रुपाली पाटील यांनी केला.
‘चाकणकरांनी भोंदू बाबाला वाचवण्यासाठी अडथळे निर्माण केले’
“रुपाली चाकणकर यांना या सगळ्या गोष्टींची माहिती होती की, त्यांचा गुरु हा भोंदूबाबा हा विकृत चाळे करतो. अत्याचार करतो. हे माहिती असूनसुद्धा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मूग गिळून गप्प बसल्या होत्या. पीडितेची बाजू न घेता त्यांनी पोलिसांना पत्र दिले आहेत. गुन्ह्याचा तपास होऊ नये यासाठी दबाव टाकला आहे. रुपाली चाकणकर यांनी भोंदूबाबाला वाचवण्यासाठी तपासात अडथळे निर्माण केले. त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या, कायदा याबद्दल बोलू नये. कोणी बदनामी केली? तुम्हीच बदनाम झाले. पाठवा नोटीस. काय व्हायचं ते होऊ दे”,, अशा शब्दांत रुपाली ठोंबरे पाटील यांनी निशाणा साधला.
