• Sun. Jun 7th, 2026
    Rain Alert: मराठवाड्यात पुढील चार दिवस पाऊस; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, पंचनामे करण्याची मागणी

    Maharashtra Weather Update 21 March 2026: विभागात आणखी चार दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे.

    marathwada crop loss(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पुढील चार दिवस म्हणजेच २४ मार्चपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपात पाऊस पडणार आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, बीड जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

    मराठवाड्यात अवकाळी पावसाने फळबागा आणि रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. तीन दिवसांपासून विभागात सर्वत्र मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे.

    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar : व्यसनी बापाची क्रूरता, अल्पवयीन मुलीचं 30 वर्षांच्या व्यक्तीसोबत लग्न, दामिनी पथकाने केली सासरहून सुटका
    या जिल्ह्यात पुढील चार दिवस म्हणजेच २४ मार्चपर्यंत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपात पाऊस होण्याचा अंदाज आहे. या भागात सोसाट्याचा वारा वाहणार आहे.

    सद्यस्थितीत वादळामुळे पिके आडवी झाली आहेत. तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी वेगवेगळ्या भागात पावसाने हजेरी लावली. वादळासह झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. जोरदार पाऊस आणि गारपीट झालेल्या भागात पिके आडवी पडली आहेत. आंब्यांची फळगळती झाली असून हिंगोली जिल्ह्यात केळी व हळद पिकाचे नुकसान झाले आहे. नांदेड, बीड जिल्ह्यात २३ आणि २४ मार्च रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपात पावसाची शक्यता आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २४ मार्चला पावसाची शक्यता आहे.

    विभागात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन कृषीतज्ज्ञांनी केले आहे. दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवसात आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. तसेच कमाल तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. विस्तारित अंदाजानुसार जिल्ह्यात २५ ते ३१ मार्च दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ राहणार आहे,असे जिल्हा कृषी हवामान केंद्राने कळविले आहे.
    Maharashtra TimesCrime News : प्रेमविवाह झाला, लग्नाच्या खर्चावरुन वाद, सून आईसोबत आली, ठोश्याने सासूबाईंचा दात पाडला, मुलावर गंभीर आरोप
    ‘शेतकऱ्यांना मदत करा’
    जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे शेती व पशुधनाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. याबाबत काळे यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. काढणीस आलेले गहू, ज्वारी, हरभरा, करडई पिके आणि द्राक्षे, आंबा, केळी, मोसंबी या फळपिकांचे नुकसान झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा