• Mon. Jun 15th, 2026
    Ashok Kharat : अशोक खरात महिलांना कशाप्रकारे जाळ्यात अडकवायचा? FIR मध्ये A टू Z खुलासा, काळ्या कृत्यांची माहिती उघड

    अशोक खरात याने नेमकं काय केलं आहे? याबाबत सविस्तर माहिती देणाऱ्या FIR ची कॉपी आता समोर आली आहे. या कॉपीमध्ये तो पीडित महिलांना कशाप्रकारे जाळ्यात अडकवायचा आणि अत्याचार करायचा? याची A टू Z माहिती उघड झाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : भविष्य सांगण्याच्या नावाने महिला आणि मुलींवर अत्याचार करणारा ढोंगी बाबा अशोक खरात याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अशोक खरात याचे धक्कादायक व्हिडीओ क्लिप समोर आले आहेत. या व्हिडीओ क्लीपमध्ये तो महिलांना गुंगी येणारं पाणी देवून आक्षेपार्ह वर्तवणूक करत असल्याचं निदर्शनास येत आहे. सुरुवातीला या अशोक खरातचे 58 आक्षेपार्ह व्हिडीओ सापडल्याचं वृत्त समोर आलं होतं. यानंतर आता तब्बल 100 आक्षेपार्ह व्हिडीओ सापडल्याचं तपासात समोर आलं आहे. अशोक खरात याचे अनेक राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. त्याचे कही नेत्यांसोबतचे फोटोही व्हायरल होत आहेत. दरम्यान, त्याच्या विरोधात दाखल गुन्ह्याची FIR कॉपी समोर आली आहे. या FIR कॉपीमध्ये आरोपी अशोक खरात हा कशाप्रकारे आपले कूकृत्य करायचा हे स्पष्टपणे नमूद केले आहे. अत्यंत संतापजनक असे कृत्य हा अशोक खरात करायचा असं या FIR मधील माहितीतून स्पष्ट होत आहे.

    संबंधित FIR मध्ये पीडितेने आपली अशोक खरात याच्यासोबत कशी ओळख झाली? या विषयी सविस्तर माहिती दिली आहे. जुलै 2021 मध्ये आपल्याला लग्नासाठी आलेल्या एका स्थळबद्दल विचारणा करण्यासाठी कुटुंबियांसोबत गेल्याचं पीडितेने सांगितलं. त्यावेळी अशोक खरातने एक खडा दिला. तो खडा गळ्यात घालायला दिला. तो खडा काढला तर लग्न मोडेल असं बाबाने म्हटलं. लग्न जमल्यानंतर आपण कॉलेजला जायला सुरुवात केली तेव्हा तो खडा गळ्यातून काढून ठेवायला लागलो. त्यानंतर अचानक मुलाकडच्यांनी हे लग्न आपल्याला करायचं नसल्याचं म्हणत ते लग्न मोडलं. त्यामुळे आपला अशोक बाबावरचा विश्वास वाढला, असं पीडितेने म्हटलं.

    यानंतर आपल्याला अनेकदा वेगवेगळे लग्नासाठी स्थळ आले. अशोक खरातने ती स्थळे चांगली नसल्याचे म्हटलं. यानंतर एक स्थळ योग्य असल्याचं अशोक खरातने म्हटलं. त्यानुसार कुटुंबियांनी लग्न जुळवत साखरपुडा केला. साखरपुड्यानंतर आपल्या होणाऱ्या पतीसह आपण या कथित बाबाच्या आशीर्वादासाठी गेलो. यावेळी या अशोक खरात बाबाने आपल्या कुटुंबियांना कॅबिनच्या बाहेर बसण्यास सांगत पीडितेला ध्यानस्थ करुन प्रार्थना करायचं असल्याचं म्हटलं. सर्वांचा अशोक खरातवर विश्वास असल्याने ते बाहेर गेले. पण त्यानंतर या कथित बाबाने आपल्या कूकृत्याला सुरुवात केली, असं पीडितेने तक्रारीत नमूद केलं आहे.

    ‘मी कृष्णाचा अवतार आहे आणि तू माझी राधा’

    या बाबाने सुरुवातीला आपल्याला तांब्याच्या भांड्यात पाणी दिलं. ते पाणी पिण्यास सांगितलं. हे पाणी खारट आणि कडवट लागलं. हे पाणी पिल्यानंतर आपल्याला मळमळल्यासारखं तसेच गरगरल्यासारखं होऊ लागलं. हे पाणी जितकं जास्त होईल तसं शुभ फळ मिळेल, असं बाबाने सांगितलं. तसेच या बाबाने ग्लास डोक्यावर ठेवून उभे राहण्यास सांगितलं आणि गायत्री मंत्र म्हणायला लावले. यानंतर या अशोक खरात बाबाने पीडितेच्या पाठीमागे जावून मंत्र म्हणायला सुरुवात करत पीडितेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली.

    आरोपी अशोक खरात याने पीडितेच्या कानात मी कृष्णाचा अवतार आहे आणि तू माझी राधा आहे, असं म्हणत अत्याचार केला. तसेच या प्रकाराबद्दल घरच्यांना किंवा कुणालाही सांगितलं तर तुला आणि तुझ्या पतीला ठार मारेन, अशी धमकी दिली. पीडितेने या धमकीच्या भीतीमुळे कुणाला सांगितलं नाही. यानंतर अशोक खरात हा वारंवार पीडितेला आशीर्वाद घेण्यासाठी येण्याचं सांगून सातत्याने अत्याचार करत राहिला. आरोपी अशोक खरातने पीडितेवर 2023 ते 2025 या काळात अनेकदा अत्याचार केला, असा आरोप पीडितेने केल्याचं एफआयआरमध्ये नमूद आहे. आता या प्रकरणात काय-काय घडामोडी समोर येतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा