• Sun. Jun 7th, 2026
    BKC Public Transport Day: कार-बाईक घरीच ठेवा! BKCतील नोकरदारांनो लक्ष द्या, दर शक्रवारी प्रवासाची पद्धत बदलली, काय आहे MMRDAचा नवा नियम?

    BKC Public Transport Day: MMRDAने आता मोठा निर्णय घेतला आहे. बीकेसीत आता भारतातील पहिला सार्वजनिक वाहतूक दिन पाळला जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत दर शुक्रवारी बीकेसीतील कर्मचाऱ्यानी मेट्रो, बेस्ट अशा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. यामाध्यमांतून वाहतूक कोंडी आणि प्रदुषणाला काहीसा ब्रेक मिळू शकतो.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन प्रवासात मोठा बदल घडवून आणण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. आता बीकेसीमध्ये दर शुक्रवारी ‘साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन’ पाळला जाणार असून कर्मचाऱ्यांना खासगी वाहनांऐवजी मेट्रो, लोकल, बस किंवा अन्य सामायिक वाहतूक साधनांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एमएमआरडीए आणि डब्ल्यूआरआय इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. भारतातील कोणत्याही प्रमुख व्यावसायिक केंद्रात अशा स्वरूपाचा साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन राबविण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा करण्यात आला आहे.

    बीकेसीतील दोन लाख कर्मचाऱ्यांवर लक्ष

    देशातील सर्वात महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रांपैकी एक असलेल्या बीकेसीमध्ये सुमारे दोन लाख औपचारिक कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणात अनौपचारिक रोजगारही येथे उपलब्ध आहे. देशातील अनेक आघाडीच्या कंपन्यांची कार्यालये याच भागात असल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी बीकेसीकडे ये-जा करतात.

    Maharashtra TimesMaharashtra Monsoon: आला रेss आला! महाराष्ट्रात मान्सून धडकला, शेतकरी राजा सुखावला, लवकरच राजधानी मुंबईसह राज्यात बरसणार

    उपक्रमाच्या घोषणेनिमित्त आयोजित चर्चासत्रात सादर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, बीकेसीमध्ये येणाऱ्या ५२ टक्के प्रवाशांचा कल अजूनही खासगी वाहने, टॅक्सी आणि रिक्षांकडे आहे. तर केवळ २५ टक्के नागरिक नियमितपणे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. यातील निम्म्याहून अधिक लोकांचा दररोजचा प्रवास दोन तासांपेक्षा जास्त वेळेचा असल्याचेही निदर्शनास आले.

    वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न

    बीकेसी परिसरात वाढती वाहतूक कोंडी, पहिल्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रवासाच्या सुविधा अपुऱ्या असणे आणि सार्वजनिक वाहतुकीशी प्रभावी जोडणी नसणे ही प्रमुख आव्हाने असल्याचे चर्चेत अधोरेखित करण्यात आले. मात्र सार्वजनिक वाहतूक अधिक सोयीची आणि विश्वासार्ह झाल्यास ८२ टक्के प्रवासी त्याचा स्वीकार करण्यास तयार असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले.

    मेट्रोमुळे वाढणार सुविधा

    अलीकडेच सुरू झालेल्या मेट्रो मार्गिकेमुळे बीकेसीच्या काही भागांना मोठा फायदा झाला आहे. भविष्यात आणखी मेट्रो मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर बीकेसीतील बहुतांश भाग मेट्रो स्थानकांच्या जवळ येणार असल्याने सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

    संयुक्त प्रयत्नांची गरज

    फीडर बस सेवा मजबूत करणे, पादचारी सुविधा सुधारणे, वाहतूक केंद्रांजवळ अधिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना राबविणे यांसारख्या उपायांवरही चर्चा झाली. शासकीय संस्था, वाहतूक यंत्रणा, उद्योग क्षेत्र आणि नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून अधिक स्वच्छ, कमी गर्दीची आणि शाश्वत शहरे उभी राहू शकतात, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा