• Sun. Jun 7th, 2026
    Beed Crime : एका महिन्यात 3 वेळा विक्री, 3 वेळा लग्न… बीडच्या तरुणीचा अमानुष छळ; चौथ्या लग्नाआधी विष पिऊन जीवन संपवायचा प्रयत्न

    एका २१ वर्षीय विवाहितेची अवघ्या एका महिन्यात तीन ठिकाणी विक्री करून तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचा संतापजनक प्रकार बीडमधून उघडकीस आला आहे. या अमानुष छळाला कंटाळून पीडितेने टोकाचे पाऊल उचलले असून…

    बीडमध्ये २१ वर्षीय विवाहितेची तीन वेळा विक्री(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुनील जाधव, बीड: जिल्ह्याला हादरवून सोडणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका २१ वर्षीय विवाहित तरुणीला पैशांच्या लालसेपोटी केवळ एका महिन्यात तब्बल तीन वेळा विकण्यात आले. या अमानुष प्रकाराला कंटाळून पीडितेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असून, सध्या ती मृत्यूशी झुंज देत आहे. मूळची लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या तरुणीचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले होते. मात्र, पतीच्या त्रासामुळे ती माहेरी राहत होती. याच काळात तिची ओळख पुण्यातील महानंदा नावाच्या महिलेशी झाली. महानंदाने तुझे दुसरे लग्न लावून देते, असे आमिष दाखवून तिला पुण्यात नेले. मात्र, हा मदतीचा हात नसून एका मोठ्या मानवी तस्करीच्या जाळ्याचा हिस्सा होता.

    एका महिन्यात तीनदा विक्री

    पीडितेच्या असहायतेचा फायदा घेत आरोपींनी तिला एखाद्या वस्तूंप्रमाणे विकायला सुरुवात केली, पहिली विक्री पुण्यातील अमर कालभोर नावाच्या व्यक्तीकडून ५ लाख रुपये घेऊन तिचे पहिले बळजबरीने लग्न लावून दिले. दुसरी विक्री, पहिल्या लग्नाला १० दिवसही पूर्ण झाले नसताना, तिला तिथून काढून दुसऱ्या एका व्यक्तीला ४.५ लाख रुपयांत विकले गेले. त्यानंतर तिसरी विक्री ४ मार्च २०२६ रोजी तुळजापूरच्या एका महिलेच्या मदतीने बीडमधील आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथील एका व्यक्तीशी तिचे तिसरे लग्न लावून देण्यात आले. या व्यवहारातूनही आरोपींनी ४.५ लाख रुपये उकळले.

    चौथ्या लग्नाचा दबाव आणि आत्महत्येचा प्रयत्न

    इतके अत्याचार होऊनही आरोपींची पैशांची हाव संपली नव्हती. ६ मार्च रोजी आरोपींनी पीडितेला पुन्हा फोन केला आणि चौथ्या लग्नासाठी तयार राहा पजजलअशी धमकी देत दबाव टाकला. या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून, तसेच भविष्यातील अंधकारमय आयुष्याच्या भीतीने पीडितेने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या तिच्यावर मिरजगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

    Maharashtra TimesPune News : सिंहगडावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; लहान मुलांसह अनेकजण जखमी, काही रुग्णालयात दाखल

    पोलिस कारवाई आणि गुन्हा दाखल

    या धक्कादायक प्रकरणाची दखल घेत आष्टी पोलिसांनी महानंदा, तिचा पती आणि तुळजापूर येथील दोन मध्यस्थ अशा एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ आणि ६१ (मानवी तस्करी व फसवणूक) अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा प्रकार केवळ एका तरुणीपुरता मर्यादित नसून, यात एक मोठे आंतरजिल्हा रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, या रॅकेटचे धागेदोरे शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

    अशा घटनांमुळे समाजात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातून होत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा