• Tue. Mar 17th, 2026
    Nagpur SBL Blast : हसत्या-खेळत्या संसाराची राखरांगोळी, जखमी रोशनी उमाठेंची प्राणज्योत मालवली

    नागपूरमध्ये हसत्या-खेळत्या संसाराची राखरांगोळी झाल्याचं बघायला मिळत आहे. एसबीएल स्फोटात जखमी झालेल्या रोशनी उमाठे यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आहे. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    नागपूर : राऊळगाव येथील एसबीएलमधील स्फोटाच्या भीषण दुर्घटनेने एका सुखी कुटुंबाचे स्वप्न चक्काचूर केले आहे. या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या 28 वर्षीय रोशनी सूर्यकांत उमाठे यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर रविवारी दुपारी 2 वाजता संपली. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रोशनी यांचे सासर काटोलचे असून पती सूर्यकांत आणि त्या स्वतः अशा दोघीही एसबीएल कंपनीत कामाला होत्या. गेल्या दोन वर्षांपासून हे दाम्पत्य आपल्या सात वर्षांच्या आरुष नावाच्या मुलासह दुधाळा येथे भाड्याने राहत होते. रविवारी काटोलमध्ये सूर्यकांत यांच्या आत्तेबहिणीचे लग्न होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्य लग्नाच्या उत्साहात मग्न असतानाच रोशनीच्या मृत्यूची बातमी आली आणि लग्नमंडपात आनंदाऐवजी शोककळा पसरली.

    रोशनी आणि सूर्यकांत यांच्या लग्नाला १० वर्षे झाली होती. त्यांचा सात वर्षांचा मुलगा आरुष सध्या दुसऱ्या इयत्तेत शिकत आहे. आई लवकरच बरी होऊन घरी येईल, या आशेवर असलेल्या चिमुरड्या आरुषच्या डोक्यावरील मातृछत्र नियतीने हिरावून नेले आहे. शनिवारपर्यंत रोशनी यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा दिसत होती. त्या पाणी आणि द्रव पदार्थ घेत होत्या, त्यामुळे त्या संकटातून सुखरूप बाहेर येतील अशी आशा नातेवाईकांना होती. मात्र, शनिवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती अचानक खालावली. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

    रोशनी यांच्या निधनानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात आणि परिसरात गोंधळ घातला. कंपनी प्रशासनाकडून योग्य नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. ऐन तरुण वयात एका कष्टकरी महिलेचा असा अंत झाल्याने दुधाळा आणि काटोल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एक आई, पत्नी आणि कष्टकरी सून अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या रोशनीच्या जाण्याने उमाठे कुटुंब कायमचे पोरके झाले आहे.

    मृतांचा आकडा 22 वर

    नागपूरच्या एसबीएल एनर्जी स्फोटातील मृतकांची संख्या आता 22 वर जावून पोहोचली आहे. विशेष म्हणजे या घटनेत 14 महिला कामगार जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सर्वाधिक महिलांचा मृत्यू झाला आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा