Middle East, War Tension: मध्य-पूर्व आशियातील युद्धजन्य तणावामुळे रायगड जिल्ह्यातील २० नागरिक आखाती देशांत अडकले आहेत. प्रशासनाने तातडीने नियंत्रण कक्ष सुरू केला असून सौदी, दुबई आणि कुवेतमध्ये असलेल्या या नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
पोलादपूर, उरण आणि सुधागडचे नागरिक अडकले
प्राप्त माहितीनुसार, पोलादपूर, उरण आणि सुधागड (पाली) तालुक्यातील नागरिक सध्या सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि दुबई येथे वास्तव्यास असून तिथेच अडकले आहेत. पोलादपूर तालुक्यातील सवाद गावातील तालेकर कुटुंबातील सहा जण सौदी अरेबियात आहेत. कुवेतमध्ये तालेकर, नेकवारे आणि पठाण कुटुंबातील सात नागरिक अडकल्याची नोंद आहे, तर दुबई येथे सात जण विविध कारणांनी थांबलेले आहेत.
कामगार आणि पर्यटकांवर परिणाम
अडकलेल्या नागरिकांपैकी बहुतांश जण रोजगार व नोकरीनिमित्त संबंधित देशांत वास्तव्यास आहेत. सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत उड्डाणांवरील निर्बंध, सुरक्षेची अनिश्चितता आणि स्थानिक मर्यादांमुळे त्यांना तात्काळ परत येणे कठीण झाले आहे. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिक पर्यटनासाठी गेले असताना परिस्थिती बिघडल्याने तिथेच अडकले असल्याचीही माहिती समोर आली आहे.
Sawantwadi Accident: काळजाचा तुकडा कायमचा हिरावला, इन्सुलीत कारला भीषण अपघात; खिडकीतून बाहेर फेकला गेल्याने 4 वर्षीय शौर्यचा चटका लावणारा अंत
विद्यार्थी सुरक्षित असल्याचा प्रशासनाचा निर्वाळा
दरम्यान, सुधागड-पाली येथील उत्कर्ष राजेश मापारा हा विद्यार्थी शिक्षणासाठी दुबईत असून तो सध्या सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तो पालकांच्या नियमित संपर्कात असून त्याच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही भीती नसल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रशासनाकडून माहिती संकलनाचे काम सुरू
रायगड जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्षामार्फत अडकलेल्या नागरिकांची सविस्तर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. संबंधितांची नावे, पासपोर्ट तपशील, वास्तव्याचे ठिकाण आणि संपर्क क्रमांक राज्य शासन व परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Kalyan Crime : विठ्ठलवाडीत पाच लाखांची फिल्मी स्टाईल लूट! ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत बॅग पळवली; खऱ्या पोलिसांनी फक्त 5 तासांत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
नातेवाईकांनी अफवांवर विश्वास न ठेवता थेट प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
