पुणे जिल्ह्यातील कापूरहोळमध्ये एका नामांकीत व्यापाऱ्याच्या 18 वर्षीय युवकाचे अपहरण झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. या घटनेनंतर अवघ्या काही तासांत जेजुरी पोलिसांनी धाडसी कारवाई करत अपहरण झालेल्या तरुणाची सुखरुप सुटका केली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, पुणे : पुणे जिल्ह्यात अपहरणाचा भयानक थरारक आज बघायला मिळाला. एका नामांकीत व्यापाऱ्याच्या मुलाचं काही आरोपींनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला. आरोपी तरुणाला गाडीत घेऊन निघाले होते. पण जेजुरी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. नाकाबंदी लावली. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी जंग जंग पछाडलं. अखेर पोलिसांना या कारवाईत मोठं यश आलं आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून तरुणाची सुखरुप सुटका केली. अपहरण झालेल्या तरुणाची सुटका करणं हे पोलिसांसाठी सोपं नव्हतं. पण पोलिसांनी अतिशय संयमी पद्धतीने परिस्थिती हाताळत आरोपींना सळो की पळो करुन सोडलं. त्यामुळे तरुणाला गाडीत सोडून आरोपींना पलायन करावं लागलं. पोलिसांनी पीडित तरुणाला सुखरुप शोधून काढलं आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ परिसरात मंगळवारी (3 मार्च) दुपारी घडलेल्या अपहरणाच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. स्थानिक नामांकित व्यापाऱ्याच्या 18 वर्षीय मुलाचे भरदिवसा अपहरण करण्यात आले होते. मात्र, मात्र जेजुरी पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासांतच युवकाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले.
नेमकं काय घडलं?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी कापूरहोळ येथून XUV कारमधून संबंधित युवकाला जबरदस्तीने घेऊन जाण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. युवकाच्या वडिलांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारेही मदतीसाठी संपर्क साधला.
माहिती मिळताच जेजुरी पोलीस आणि निरा पोलिसांनी जेऊर आणि नीरा परिसरात तात्काळ नाकाबंदी केली. संशयित वाहनाचा शोध सुरू असतानाच जेऊरकडून पिसुर्टीकडे जाणारी एक संशयित कार पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांनी कार अडवण्याचा प्रयत्न केला असता, रस्ता अरुंद असल्याने ती कार ऊसाच्या शेतात जाऊन अडकली.
या गोंधळाचा फायदा घेत अपहरणकर्ते घटनास्थळावरून पसार झाले. मात्र पोलिसांनी तत्परतेने कारमधील युवकाची सुरक्षित सुटका केली आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आणि तात्काळ नाकाबंदी केल्यामुळे मुलाची सुरक्षित सुटका शक्य झाली. आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी दीपक वाकचौरे यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलीस करत आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा