• Sat. Mar 14th, 2026
    Nagpur SBL Company Blast : प्रत्येक मृतकाच्या कुटुंबाला 82 लाखांची तर जखमींना 25 लाखांची मदत जाहीर

    नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात एका कंपनीत झालेल्या स्फोटात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेतील मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 82 लाख आणि जखमींना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबी एल एनर्जी लिमिटेड या स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 19 निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 23 कामगार जखमी आहेत. त्यापैकी 13 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून अनेक कामगार 60 ते 80 टक्क्यांपर्यंत भाजल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर मृतकांच्या नातेवाईकांना 82 लाखांची आर्थिक मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

    या प्रकरणी आज नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीत स्फोटासंदर्भातील प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात कंपनी व्यवस्थापनाचा गंभीर निष्काळजीपणा समोर आल्याचे सांगण्यात आले. सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन झाले नसल्याची बाब अधोरेखित करण्यात आली असून संबंधितांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.

    मृत्यकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 82 लाखांची तर जखमींना 25 लाखांची मदत

    बैठकीत मृतकांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदतीचा मोठा निर्णय जाहीर करण्यात आला. कंपनीमार्फत 75 लाख रुपये, राज्य सरकारकडून 5 लाख आणि केंद्र सरकारकडून 2 लाख रुपये अशी एकूण 82 लाखांची मदत प्रत्येक मृतकाच्या वारसांना दिली जाणार आहे. ही रक्कम पालक आणि पाल्य यांच्या संयुक्त खात्यात जमा करण्यात येईल. मुलं सज्ञान झाल्यानंतरच त्यांना ही रक्कम वापरता येईल, अशी तरतूद करण्यात येणार आहे. तसेच जखमी कामगारांना 25 लाख रुपयांची मदत देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. जखमी आणि मृतकांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.दरम्यान, स्फोटातील 13 जखमींची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. अनेकांना 60 ते 80 टक्के भाजल्यामुळे त्यांच्यावर विशेष वैद्यकीय उपचार सुरू आहेत. प्रशासनाकडून उपचारासाठी आवश्यक ती सर्व मदत दिली जात असल्याचे सांगण्यात आले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

    बैठकीत अनिल देशमुख आक्रमक

    या बैठकीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतली. नागपूर जिल्ह्यातील सर्व स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची तातडीने व्यापक सुरक्षा तपासणी करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली. वारंवार पत्रव्यवहार करूनही पेसो आणि डिश या संबंधित संस्थांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे संबंधित संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणीही त्यांनी बैठकीत लावून धरली.

    या बैठकीत भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. औद्योगिक सुरक्षा नियमांचे पालन सक्तीने करण्यात यावे, नियमित सेफ्टी ऑडिट अनिवार्य करावे आणि कामगारांना आवश्यक प्रशिक्षण देणे बंधनकारक करावे, अशा सूचना देण्यात आल्या. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा