• Fri. Mar 6th, 2026

    Tejas Express: रेल्वेच्या नावाने ‘शिमगा’! तेजस एक्सप्रेसला 7 तास उशिर; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल

    Tejas Express: रेल्वेच्या नावाने ‘शिमगा’! तेजस एक्सप्रेसला 7 तास उशिर; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल

    Konkan Railway: रविवारी कोकणात शिमग्यासाठी निघालेल्या नागरिकांचे मोठे हाल झाले होते. सकाळी सीएसएमटी स्थानकावरून निघणारी तेजस एक्सप्रेस तब्बत 7 तास उशिराने निघाल्यामुळे प्रवासी स्थानकांवरच रखडले होते.

    म.टा. खास प्रतिनिधी, ठाणे: शिमग्याच्या सणानिमित्त कोकणात जाण्यासाठी रेल्वेस्थानकांत आलेल्या कोकणवासीयांना रखडलेल्या तेजस एक्स्प्रेसमुळे रविवारी सकाळी स्थानकांतच बराच काळ रखडून राहावे लागले. सकाळी ५.५० वाजता मुंबई सीएसएमटी रेल्वेस्थानकातून सुटणारी ही एक्स्प्रेस तब्बल सात तास उशिरा, म्हणजे दुपारी १२ वाजून ५८ मिनिटांनी सुटली. यामुळे सकाळी लवकर रेल्वेस्थानकात एक्स्प्रेस पकडण्यासाठी दाखल झालेल्या प्रवाशांना सीएसएमटी, दादर, ठाणे आणि पनवेल रेल्वेस्थानकात खोळंबून राहावे लागले. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलावर्ग यांचे यामुळे प्रचंड हाल झाल्याने प्रवाशांनी कोकण रेल्वेच्या नावाने अक्षरश: ‘शिमगा’ केला.

    कोकणामध्ये होळी, अर्थात शिमग्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून, कोकणात गावी पालखी नाचवण्यासाठी कोकणवासी मोठ्या संख्येने जातात. रेल्वेकडूनही यादरम्यान विशेष मेल एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्या सोडल्या जात आहेत. या गाड्यांचे आरक्षण मिळवण्यासाठी गर्दी उसळते. २ मार्च रोजीच्या होळीसाठी रेल्वेमध्ये दोन ते तीन दिवसांपासूनच प्रवाशांची गर्दी वाढली होती. रविवारी १ मार्च रोजी सकाळी कोकणात जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमधून प्रवास करण्यासाठी प्रवासी पहाटे रेल्वेस्थानकात पोहोचले. रेल्वेगाडी उशिरा धावणार असल्याची सूचना मिळाल्याने प्रवाशांना धक्का बसला.

    Maharashtra TimesKonkan Railway: होळीनिमित्त मुंबई-कोकण 8 विशेष रेल्वेगाड्या; सावंतवाडी रोड, कणकवली, कुडाळ… कुठे असतील थांबे?

    कोकण रेल्वेचा खोळंबा नित्याचा

    तेजस एक्स्प्रेस, जनशताब्दी, मांडवी या रेल्वेगाड्यांना होणारा उशीर ही नित्याचीच बाब झाली आहे. या खोळंब्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. एका दिवसाच्या खोळंब्याचा परिणाम परतीच्या प्रवासावरही होतो. अन्य गाड्याही सण, उत्सवाच्या काळात खोळंबतात. ही रखडपट्टी आता नित्याची झाली असल्याची भावना असल्याचे प्राची डिंगणकर यांनी सांगितले.

    Maharashtra TimesPanvel-Karjat Railway: पावसाळ्यानंतर पनवेल-कर्जत रेल्वेसेवा सुरू, मध्य रेल्वेवर पाचवा मार्ग; 5 स्थानकांचा समावेश

    वेळेत पूर्व सूचना नाहीत

    सकाळी लवकर असलेली ही एक्स्प्रेस पकडण्यासाठी डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, दिवा या भागातून येणाऱ्या प्रवाशांची ठाण्याच्या फलाट क्रमांक ५ वर मोठी गर्दी झाली होती. या फलाटावर येणाऱ्या अन्य लोकलगाड्या आणि एक्स्प्रेसची गर्दी वाढत असल्याने फलाटावर सामानासह उभे राहणेही प्रवाशांना कठीण झाले होते. स्थानकात पोहोचल्यानंतर, गाडी १०.५० वाजता सुटेल अशी सूचना देण्यात आली होती. परंतु ही गाडी प्रत्यक्षात सात तास उशिराने सुटली. या दरम्यान फलाटावर वेळ घालवावा लागलेल्या प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला. कोकण रेल्वेच्या रेल्वे रुळांच्या दुहेरीकरणाच्या कामामुळे गाडीला उशीर झाल्याची चर्चा प्रवाशांमध्ये होती. पण, रेल्वेकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा