• Sat. Mar 7th, 2026

    Nagpur Blast: नागपूरच्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; 18 गंभीर जखमी, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

    Nagpur Blast: नागपूरच्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; 18 गंभीर जखमी, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

    Nagpur Raulgaon Blast: प्लांटमध्ये हा स्फोट कसा झाला, याबाबत कंपनी निरुत्तर आहे. परिणामत: वारंवार होणाऱ्या अशाप्रकारच्या स्फोटांचे ऑडिट करण्याची मागणी होऊ लागली आहे.

    नागपूर ब्लास्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीत रविवारी सकाळी ७ ते ७.३० वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत १८ श्रमिकांचा मृत्यू झाला, तर १८ श्रमिक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर स्थानिक ऑरेंज सिटी हॉस्पिटल आणि ए स्क्वेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये १४ महिला कामगारांचा समावेश आहे.

    प्राप्त माहितीनुसार, एसबीएल एनर्जी लिमिटेड ही कंपनी प्रामुख्याने खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारी आणि डिटोनेटर्सची निर्मिती करते. रविवारी सकाळी कंपनीत नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक डिटोनेटर तयार करण्याच्या युनिटमध्ये स्फोट झाला. श्रमिक अंतिम टप्प्यातील क्रिम्पिंग प्रक्रिया करीत असताना जोरदार आवाज होऊन झालेल्या या स्फोटाचा आवाज परिसरात कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. याबाबत सांगताना पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले, ‘एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.’

    Maharashtra TimesNagpur Blast: नागपूर स्फोटातील मृतांचा आकडा 17 वर, प्रत्येक मृत कामगाराची DNA चाचणी होणार, दोन दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य
    या स्फोटामुळे पुन्हा एकदा स्फोटक निर्माण करणाऱ्या कंपन्यांमधील औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या स्फोटाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, पोलिस प्रशासन, पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था (पेसो), औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय (डिश) यांच्याद्वारे चौकशी सुरू आहे. कंपनीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसर, नॉन-इलेक्ट्रिक डिटोनेटर याला उद्योगविश्वात ‘नॉन-नेल’ असेही म्हटले जाते. यात स्फोट घडवण्यासाठी विजेचा वापर न करता शॉक वेव्ह किंवा गॅस प्रेशरचा वापर केला जातो. खाणकाम, बोगदे तयार करणे आणि बांधकामांमधील नियंत्रित स्फोटांसाठी याचा प्रामुख्याने वापर होतो, अशी माहिती कंपनीतील अधिकाऱ्यांनी दिली.

    Maharashtra TimesNagpur Blast : मंगेश्री बाहेर येईल ना? नागपुरात दारुगोळा निर्मिती कंपनीत एकामागून एक स्फोट, धुराच्या लोटांखाली एका आईची कासावीस प्रतीक्षा
    पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर
    प्रत्येक मृताच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून २ लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपये आर्थिक मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शोकसंवेदना व्यक्त करीत ‘जनता दरबार’सह दिवसभरातील सर्व जाहीर कार्यक्रम रद्द केले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा