Israel-Iran War: मध्य पूर्वेत सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्तपणे हल्ला केल्यामुळे हवाई वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. आज दिवसभरातही अनेक उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे.
मंत्रालयाची माहिती
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याबद्दल आज माहिती दिली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले. ‘ऑपरेशनल नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) विमान कंपन्यांशी जवळून समन्वय साधत आहे’, अशी माहिती त्यांनी आपल्या पोस्टद्वारे दिली.
कालही अनेक उड्डाणे रद्द
काल इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे हवाई क्षेत्र बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे 28 फेब्रुवारीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. एकूण 57 विमान सेवा काल रद्द करण्यात आल्या होत्या. शिवाय युएई ते इस्रायल पर्यंतचे हवाई मार्ग कालपासून बंद करण्यात आले आहेत. यामुळे भारत आणि पश्चिमेकडील देशांमधील हवाई वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. भारीतय हवाई कंपन्यांनी 2 मार्चपर्यंत या प्रदेशातील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. यामुळे दुबईसह अनेक विमानतळावर नागरिक अडकून पडले आहेत.
Ali Khamenei Dead : सर्वोच्च नेता खामेनींचा मृत्यू, इराणी माध्यमांची घोषणा; मुलगी-सून-जावयाचाही खात्मा झाल्याचं वृत्त
शनिवारी मध्य-पूर्वेत पेटलेल्या संघर्षामुळे एकूण 900 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. अनेक भारतीय कर्मचारीही येथे अडकले होते. एअर इंडियाने त्यांना यावेळी सुखरूपपणे बाहेर काढण्याचं काम केलं. शनिवारी सायंकाळी 5.45 वाजेपर्यंत मुंबई विमानतळावर ठप्प झालेल्या सेवांमध्ये इंडोगोच्या मुंबई-लंडन सेवेचाही समावेश आहे. यामुळे विमानसेवेचं भाडं वाढलं असून, आज, 1 मार्चला, लंडनला जाणाऱ्या थेट तिकिटांची किंमत 1.4 लाख रुपयांवर पोहचली आहे.
आज कशी असेल स्थिती?
एअर इंडियाकडून रविवारी, दिल्ली, मुंबई आणि अमृतसरहून लंडन, न्यू यॉर्क, नेवार्क, शिकागो, टोरंटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिसला जाणाऱ्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, इंडोगोकडूनही पश्चिम आशिया आणि काही आंतरराष्ट्रीय क्षेत्रांमध्ये जाणारे उड्डाणे आज रद्द करण्यात आले आहे. प्रवाशांना विनंती केली आहे की त्यांनी आपल्या फ्लाइटची स्थिती पाहूनच घराबाहेर पडावे.
