• Thu. Sep 17th, 2026

पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला शासनाच्या  योजनांची जोड देऊन व्यवसायवृद्धीला चालना द्यावी – पालकमंत्री नितेश राणे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 17, 2026

सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही अतिशय महत्त्वाची योजना असून समाजातील १२ बलुतेदार आणि १८ पारंपरिक व्यवसायांमध्ये कार्यरत असलेल्या कारागिरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची क्षमता या योजनेत आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत ही योजना जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करूया, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळाव्याचे आयोजन जिल्हाधिकारी करण्यात आले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे दूरदृश्यप्रणालीद्वारे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे,  प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी वीरसिंग वसावे, समिती सदस्य प्रभाकर सावंत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी टी.डी. गावडे यांच्यासह संबंधित अधिकारी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला प्रशिक्षण, आधुनिक अवजारे आणि अर्थसहाय्याची जोड देऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. जिल्ह्यातील पात्र कारागिरांनी योजनेची माहिती घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, जिल्ह्यात पिढ्यान्‌पिढ्या पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांचे कौशल्य ही जिल्ह्याची मोठी संपत्ती आहे. या कौशल्याला शासनाच्या योजना, आधुनिक साधने, कौशल्य प्रशिक्षण आणि अर्थसहाय्याची जोड मिळाल्यास कारागिरांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याची नवी संधी मिळू शकते. पात्र कारागिरांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा, पारंपरिक पद्धतीने हाताने व अवजारांच्या सहाय्याने काम करणाऱ्या कारागिरांना ओळख, कौशल्यविकास, आधुनिक साधने तसेच आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देत त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सुतार, सोनार, लोहार, चर्मकार, गवंडी, मूर्तिकार, परीट, शिंपी, कुंभार, हार-तुरे तयार करणारे, नाभिक, विणकर, चटई व झाडू बनविणारे, दोऱ्या तयार करणारे, होडी बांधणारे, मासेमारीची जाळी बनविणारे, कुलूप तयार करणारे तसेच पारंपरिक खेळणी बनविणारे अशा १८ पारंपरिक व्यवसायांतील कारागिरांचा समावेश आहे.

योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांना मूलभूत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण कालावधीत दररोज ५०० रुपये विद्यावेतन दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसायासाठी आवश्यक अवजारे व साधने खरेदी करण्यासाठी १५ हजार रुपयांचे टूलकिट वस्तुरूपात देण्यात येते. लाभार्थ्यांना ओळखपत्र व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रही दिले जाते.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसायासाठी पहिल्या टप्प्यात १ लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज उपलब्ध होते. पहिल्या टप्प्यातील कर्जाची वेळेत परतफेड केल्यास व्यवसायाच्या विस्तारासाठी दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊ शकते. या कर्जावर ५ टक्के व्याजदर लागू असून उर्वरित व्याजाची जबाबदारी शासनाकडून घेतली जाते.

 सिंधुदुर्गात ५ हजार ६७४ अर्ज

जिल्ह्यात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत आजअखेर ५ हजार ६७४ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १ हजार ४७६ लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र कारागिरांनी जवळच्या सीएससी (CSC) केंद्राशी संपर्क साधावा. अधिकृत पोर्टल pmvishwakarma.gov.in वर नोंदणी करता येते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी केले तर आभार जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी टी.डी. गावडे यांनी मानले.

 000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed