• Tue. Mar 10th, 2026
    Satara Crime : तरुणीसोबत गैरकृत्य, तिच्या कुटुंबियांनी तरुणाचा काढला काटा, पोलिसांकडून सिनेस्टाईल प्रकरणाचा उलगडा

    सातारा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका तरुणाचा मृतदेह नीरा नदी पात्रात आढळला होता. त्याच्या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. विशेष म्हणजे मृतक तरुण हा स्त्री लंपट होता, याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींना शोधून काढलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : फलटणमधील नीरा नदी पात्रात आढळून आलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले आहे. अंकुश बापू नरबट (वय २२, रा. ढाकणी, ता. माण), असे मृत तरूणाचे नाव असून त्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना तपासात उघड झाली आहे. मृत तरूण तरूणाने अत्याचार केलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनीच त्याचा खून करून मृतदेह नदी पात्रात टाकला होता. या प्रकरणी एका दाम्पत्यासह त्यांचा मुलगा आणि सुनेला पोलिसांनी अटक केली आहे. मृत तरूण हा स्त्री लंपट होता, या एका माहितीवरून फलटण पोलिसांनी तरूणाच्या हत्येचा पर्दाफाश केला.

    ज्ञानेश्वर भरतराव भगत, अर्चना ज्ञानेश्वर भगत, आविष्कार ज्ञानेश्वर भगत, श्रद्धा आविष्कार भगत (रा. पिंप्रद, ता. फलटण) यांना तरूणाच्या खून प्रकरणात फलटण पोलिसांनी अटक केली आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशा पद्धतीने संशयितांनी हा गुन्हा केला आहे. मृत तरूणाने संशयित आरोपींच्या कुटुंबातील मुलीवर अत्याचार केला होता. पण, खोट्या प्रतिष्ठेपायी त्यांनी कोठेही वाच्यता न करता बदला घेण्यासाठी त्याचा खून करण्याचा कट रचला.

    आरोपींनी कसा कट रचला?

    मृत अंकुश नरबट याला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्लॅन संशयितांनी आखला. त्यासाठी महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट उघडले. इन्स्टाग्रामवरून त्याच्याशी मैत्री करत त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. १५ ऑक्टोबर रोजी त्याला फलटणला भेटायला बोलाविले. तो आल्यानंतर आरोपींपैकी एका महिलेने त्यास एकांतात वेळ घालविण्याच्या बहाण्याने तातमगिरी डोंगराच्या पायथ्याला निर्जनस्थळी नेले.

    फलटण पोलिसांनी आरोपींना कसं शोधलं?

    हत्येच्या कटानुसार बाकीचे संशयित आरोपी वेगवेगळ्या वाहनातून त्याठिकाणी पोहचले. तेथे त्यांनी अंकुशला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. नंतर चारचाकी वाहनामध्ये घालून पिंप्रद (ता. फलटण) गावच्या हद्दीतील निर्जनस्थळी नेवून त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह गोखळी गावच्या हद्दीतील नीरा नदीच्या पात्रात टाकला. पाण्यात आढळलेल्या मृताच्या डोक्यावरील जखमांमुळे घातपाताची शक्यता बळावली. पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे नव्हते. मृत तरूण स्त्री लंपट होता, या एका माहितीवरून फलटण पोलिसांनी हत्येचा गुन्हा उघडकीस आणला.

    तरुणाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयतांना उद्या फलटण न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांनी दिली आहे. कोणतेही धागेदोरे नसताना फलटणचे डीवायएसपी विशाल खांबे, पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे उपनिरीक्षक दीपक पवार, अमंलदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सुर्यवंशी, हणमंत दडस यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा