• Thu. Mar 12th, 2026
    Satara News : साताऱ्यात शेतात अफूच्या झाडांची लागवड, पोलिसांना खबर, शेतकऱ्याला अटक

    साताऱ्यात अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली आहे. भादे गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात अफूच्या झाडांची लागवड केली होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या निर्मिती आणि तस्करीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलिसांनी आज अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली आहे. भादे गावातील शेतकऱ्याने त्याच्या शेतात लागवड केलेली 2 लाखांची अफूची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी शेत मालक अशोक दगडू गायकवाड (वय 63) यास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भादे गावात अशोक गायकवाड या शेतकऱ्याने त्याच्या शेतात अफूची लागवड केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांना खबऱ्याकडून मिळाली. भादे गावातील सिध्देश्वर मंदीराजवळच्या मळा नावाच्या शिवारात दोन ठिकाणी प्रतिबंधित अफिमची (अफू) लागवड करण्यात आली होती. याबाबतची माहिती फलटणचे डीवायएसपी विशाल खांबे यांना देण्यात आली.

    पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे, उपनिरिक्षक शंकर पांगारे, अंमलदार सुधाकर सूर्यवंशी, नितिन नलवडे, गिरिश भोईटे, विजय शिंदे, अजित बोराटे, सुरज चव्हाण, अक्षय बगाड, होमगार्ड अजय मोरे, संतोष इंगवले, प्रशांत चव्हाण हे फॉरेन्सिक टीम आणि शासकीय पंचासह घटनास्थळी दाखल झाले. त्याठिकाणी अफूची लागवड केल्याचे निदर्शनास आले. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने २ लाख रुपये किमतीची ७ किलो ९१५ ग्रॅम अफू जप्त केली.

    खंडाळ्याचे नायब तहसीलदार दत्तात्रय गवारी यांच्या समक्ष अफूची झाडे जप्त करण्यात आली. या प्रकरणी अशोक दगडू गायकवाड याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. त्याला खंडाळा न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अंमलदार अक्षय बगाड यांनी फिर्याद दिली असून उपनिरिक्षक शंकर पांगारे हे अधिक तपास करत आहेत.

    दरम्यान, अंमली पदार्थांच्या व्यापाराबाबत अथवा उत्पादनाबाबत माहिती असल्यास नागरिकांनी शिरवळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. संबंधिताचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे अवाहन शिरवळचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांनी केले आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा