Arvind Kejriwal: ‘केजरीवाल आणि सिसोदिया दोघेही आपलेच कार्यकर्ते आहेत. त्यांनी समाज आणि देशाच्या हिताचे काम करीत राहावं,’ असं अण्णा हजारे म्हणाले.
‘दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे आमचेच कार्यकर्ते आहेत. मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात त्यांना अटक झाल्यावर त्यावेळी मी जे बोललो त्यावेळी न्यायालयाचा निर्णय आला नव्हता. न्यायालयाचा निर्णय असता, तर मी असे बोललो नसतो. न्याय व्यवस्था सर्वोच्च आहे,’ अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.
मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी केजरीवाल यांना अटक झाली त्यावेळी अण्णा हजारे यांनी त्यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. आता केजरीवाल आणि सिसोदिया यांची न्यायालयातून निर्दोष सुटका झाली आहे. यासंबंधी प्रसारमाध्यामांनी विचारले असता हजारे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीसंबंधी विचारले असता हजारे म्हणाले, ‘लोकांची मागणी असेल तर सरकारने चौकशी केली पाहिजे. लोकांच्या भावना सरकारने विचारात घेतल्या पाहिजेत. मात्र, जी गोष्ट डोळ्याने पाहिली नाही, ऐकलीही नाही, त्यावर माझे वैयक्तिक काहीच मत नाही. त्यावर मी काही बोलू शकत नाही.’
केजरीवाल काय म्हणाले?
न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना आज अश्रू अनावर झाले. “आमच्याविरोधात संपूर्ण खोटी केस तयार करण्यात आली. ‘आप’ला संपवण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह या दोघांनी सर्वांत मोठं राजकीय षडयंत्र रचलं. आमच्या पक्षाच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. भारताच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं ते घलं. मला सहा महिने आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना दोन वर्षे तुरुंगात ठेवलं, पण आम्ही इमानदार असल्याचं आता कोर्टाने सांगितलं आहे,” अशा भावना केजरीवाल यांनी व्यक्त केल्या.
