छत्रपती संभाजीनगरमधील एमजीएम हॉस्पिटल परिसरात एका महिलेची छेड काढून तिला मारहाण करणाऱ्या दोन नायजेरियन तरुणांना संतप्त जमावाने बेदम चोपले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तरुणांना जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एमजीएम हॉस्पिटल रोडवर या दोन नायजेरियन तरुणांनी एका महिलेची छेड काढली. केवळ छेडछाडच नाही, तर या तरुणांनी महिलेला मारहाण देखील केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. ही वार्ता परिसरात पसरताच स्थानिकांचा संयम सुटला आणि बघता बघता मोठी गर्दी जमा झाली.संतप्त झालेल्या जमावाने या दोन्ही परदेशी तरुणांना घेराव घातला. नागरिकांमध्ये इतका प्रचंड संताप होता की, त्यांनी हातात दगड आणि जवळ पडलेल्या वस्तूंनी या तरुणांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. काही वेळ या परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून परिसरातील घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला संतप्त जमावाला शांत करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरले, कारण जमाव या तरुणांना सोडण्याच्या तयारीत नव्हता. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने आणि प्रयत्नांनी या दोन्ही तरुणांना जमावाच्या तावडीतून वाचवले आणि आपल्या ताब्यात घेतले.
तपास आणि पोलीस बंदोबस्त…
सध्या या दोन्ही नायजेरियन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. महिलेने केलेल्या आरोपांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवत आहेत. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
