• Fri. Mar 6th, 2026
    Pune News: अजित पवार विमान दुर्घटना प्रकरण: घातपात आढळल्यास गुन्हा दाखल करणार, सीआयडीचा इशारा

    अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास आता CID कडे गेला आहे. पुणे सीआयडी अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत तपासाची सविस्तर दिशा स्पष्ट केली असून ….

    पुणे सीआयडी पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाची दिशा स्पष्ट केली.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे. आमदार रोहित पवार यांनीही यासंदर्भात मागणी केली आहे. त्यांनी व्हीएसआर विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, आज अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासप्रकरणी पुण्यात सीआयडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी सीआयडी अधिकाऱ्यांनी हा विमान अपघाताचा तपास का महत्त्वाचा आहे, हे स्पष्ट केले. तसेच त्यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास योग्य दिशेने सुरू आहे; तपासात घातपात आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल. यासंदर्भात पुणे आणि मुंबई येथील पोलीस अधिकारी तपास करत आहेत.

    नेमकं काय म्हणाले अधिकारी?

    “बारामती येथील विमान दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विमानातील अजित पवार व अन्य व्यक्तींच्या आकस्मिक मृत्यूचा तपास पोलिस स्टेशन बारामती येथे कलम १९४ बीएनएसएस अंतर्गत नोंद करण्यात आला होता. त्यानंतर हा तपास पोलिस महासंचालकांनी सीआयडीकडे वर्ग केला आहे. सध्या हा तपास सीआयडी करत आहे. सदर तपास पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.या मृत्यूमागे घातपात आहे का, हा तपासाचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर गुन्हेगारी निष्काळजीपणा आहे का, हा तपासाचा भाग आहे. तिसरा मुद्दा म्हणजे या प्रकरणात कोणते गुन्हेगारी कृत्य घडले आहे का, हेही तपासले जात आहे. वरील सर्व बाबींच्या अनुषंगाने या प्रकरणाचा तपास सुरू आहे.”

    Maharashtra TimesYugendra Pawar: अजितदादांचा अपघात, VSR विमान कंपनीवरील कारवाई, राज्यसभा निवडणूक ते राष्ट्रवादी विलीनीकरण; युगेंद्र पवारांनी स्पष्ट केली भूमिका

    तपासाची दिशा आणि सहकार्य करणाऱ्या संस्था

    “या अपघाताच्या पहिल्या क्षणापासून आतापर्यंत तपास अतिशय प्रोफेशनल पद्धतीने आणि योग्य दिशेने सुरू आहे. बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील फॉरेन्सिक विभाग, पुण्यातील फॉरेन्सिक सायन्स लॅब, एव्हिएशन ऑथॉरिटी, इतर संबंधित एजन्सी तसेच केंद्रातील अनेक संस्था या तपासात सहकार्य करत आहेत.”

    AAIB आणि CBI संदर्भात भूमिका

    “एएआयबी (AAIB) यांच्याशी सीआयडीचा सातत्याने संपर्क असून त्यांचाही तपास सुरू आहे. त्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल आकस्मिक मृत्यूच्या तपासात महत्त्वाचा ठरेल. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनानेही हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.

    Maharashtra TimesBMC Appointed Corporators List : ठाकरेंचे 3, काँग्रेसचा 1, भाजपचे 4 तर शिंदेंचे 2, महापौरांकडून स्वीकृत नगरसेवकांची घोषणा

    थोडक्यात, या तपासामध्ये घातपात, गुन्हेगारी निष्काळजीपणा किंवा अन्य गुन्हेगारी कृत्य निष्पन्न झाल्यास योग्य त्या कलमांखाली सीआयडी गुन्हा दाखल करून पुढील तपास पूर्ण करेल आणि न्यायालयात अभियोग चालवेल,” असे सीआयडी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा