• Fri. Mar 13th, 2026
    Baramati News : ‘बारामती एकत्र आहे, सत्यासाठी, न्यायासाठी’; बारामती पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांची गर्दी, अजिदादांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी

    Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सखोल चौकशी व्हावी. व्हीएसआर कंपनी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहे.

    बारामती पोलीस स्टेशन नागरिकांची गर्दी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, पुणे (बारामती) : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात आज वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. अजितदादांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी बारामतीतील नागरिक मोठ्या संख्येने बारामती पोलीस ठाणे येथे एकवटले. घटनेची माहिती मिळताच आमदार रोहित पवार तसेच युगेंद्र पवार यांनी बारामती पोलीस ठाण्यात दाखल होत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित नागरिकांनी ‘अमर रहे अजितदादा अमर रहे’, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. अपघातामागील नेमकी कारणे समोर यावीत तसेच संपूर्ण घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली.

    बारामतीकरांच्या भावनांचा उद्रेक

    बारामतीकरांच्या भावनांचा उद्रेक यावेळी स्पष्टपणे दिसून आला. अजितदादांवर प्रेम करणाऱ्या जनतेने अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित करत या प्रकरणाचा संपूर्ण तपास व्हावा, संबंधित सर्व बाबींची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी केली. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने पोलीस ठाणे परिसरात बंदोबस्त वाढवला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांच्या मागणीनंतर या प्रकरणाच्या चौकशीबाबत पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
    Maharashtra TimesSnake Rescuer Akash Jadhav : 56 लाख सबस्क्रायबर्स, सर्पमित्राचा मुखवटा, गांजा रॅकेटचा सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात; आकाश जाधवला पोलीस कोठडी

    दादांचे समर्थक, दादांचे प्रेमी

    दरम्यान, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या युगेंद्र पवार यांनी बोलताना म्हटलं की, ‘व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही, आमच्या सगळ्यांची मागणी आहे. इथे दादांचे समर्थक, दादांचे प्रेमी आणि बारामतीचे नागरिक जमले आहेत आणि संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा, योग्य ती कारवाई व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. आम्ही सगळे रोहित दादांच्या मागे उभे आहोत. अजित दादांना न्याय मिळाला पाहिजे, या प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे. बारामती पोलिसांकडून न्याय मिळेल याची आम्हाला 100% खात्री आहे. डीजीसीएचा रिपोर्ट आला होता, त्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं की क्रिमिनल नेगलिजेंसमुळे विमानाचा मेंटेनन्स न केल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत. हे आपल्याला रिपोर्टमध्ये दिसताना, क्रिमिनल नेगलिजेंस जर हे डीजीसीएकडून येत असेल तर मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं युगेंद्र पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा