• Mon. Jun 15th, 2026
    Sudhir Mungantiwar : सत्ताधारी आमदारांमध्येच सभागृहात जुंपली, सुधीर मुनगंटीवारांच्या प्रश्नांनी योगेश कदमांची दमछाक, काय घडलं?

    Sudhir Mungantiwar and Yogesh Kadam : सुधीर मुनगंटीवारांनी धान उत्पादकांच्या बोनसबाबत राज्यमंत्री योगेश कदम यांना चांगलेच धारेवर धरले.

    सुधीर मुनगंटीवार योगेश कदम शेतकरी बोनस वाद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल सोमवारपासून सुरुवात झाली आहे. 6 मार्च शुक्रवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार आहेत. दरम्यान, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या मुद्द्यावरुन आज मंगळवारी अधिवेशनात लक्षवेधी मांडल्यानंतर सत्ताधारी आमदारांमध्येच चांगलीच जुंपल्याचं दिसून आलं. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या मुद्द्यावरुन नागरी अन्नपुरवठा विभागाचे राज्यमंत्री तथा शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) योगेश कदम यांना अक्षरश: फैलावर घेतलं. सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधीवर बोलताना ‘मंत्र्यांनी अभ्यास करुन यायला हवे, नुसते बघतो, बैठक लावतो, असे बोलून चालत नाही’, अशा शब्दांत योगेश कदमांना सुनावलं. योगेश कदम यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करुन त्यांचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकूणच सुधीर मुनगंटीवारांच्या एकापाठोपाठ प्रश्नांच्या सरबत्तीमुळे योगेश कदम यांची चांगलीच भंबेरी उडाली.

    सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

    ‘राज्यातील तब्बल 7 लाख शेतकरी धानाच्या बोनसच्या घोषणेची वाट पाहत आहेत. 15 डिसेंबर 2025 रोजी मी धान उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यामुळे जानेवारीत धान उत्पादकांच्या बोनसचा जीआर निघेल, अशी अपेक्षा होती. पण सुरुवातीला जिल्हा परिषद निवडणुकांचे कारण देण्यात आलं. पण ही निवडणूक संपल्यानंतरही अद्यापपर्यंत धान उत्पादकांच्या बोनसचा जीआर निघालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी 15 डिसेंबरला कार्यवाहीचे आदेश दिले होते. इतके स्पष्ट आदेश असतानाही माननीय राज्यमंत्र्यांचा अन्न नागरी पुरवठा विभाग अजूनही कुंभकर्णाचा बाप बनून झोपेत असेल तर, ही अधिवेशनातील पहिलीच लक्षवेधी होती. अधिवेशनात पहिलाच निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा होणे अपेक्षित होते. राज्यमंत्र्यांकडून धान उत्पादकांच्या बोनसबाबत ठोस आणि नेमक्या उत्तराची अपेक्षा होती’, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी कदमांना चांगलेच धारेवर धरले.
    Maharashtra TimesRajya Sabha Election: राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा निर्णय झाला, भाजपमधून दिग्गज नेत्याचं कमबॅक होण्याची शक्यता, कोणती नावे चर्चेत?

    योगेश कदम काय म्हणाले?

    यावर योगेश कदम यांनी धान उत्पादकांना गेल्या तीन वर्षांमध्ये देण्यात आलेल्या बोनसची आकडेवारी मांडली. ‘2022-23 मध्ये बोनस म्हणून आपण 823 कोटी रुपयांचा निधी खर्च केला होता. 2023-24 मध्ये आपण 1378 कोटी दिले आणि 2024-25 मध्ये 1628 कोटी रुपयांचा निधी दिला. नोंदणीकृत शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाते. मात्र, ही रक्कम आणि धान खरेदीच्या गुणोत्तराचे प्रमाण याची फेरतपासणी होणे गरजेचे आहे’, असे योगेश कदम यांनी म्हटलं.

    मुनगंटीवारांचा पारा चढला

    योगेश कदम यांच्या या उत्तरावर सुधीर मुनगंटीवारांचा पारा अधिक चढला. ‘धान उत्पादक हा सगळ्यात गरीब शेतकरी असतो. अनुदानाची रक्कम वाढल्यामुळे निधीचा आकडा वाढला आहे. धान विक्री होवो अथवा न होवो, पोर्टलमध्ये नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना बोनस मिळाला पाहिजे. मात्र, धानाचा बोनस देण्याची वेळ येते तेव्हा चर्चा आणि मंथन सुरु होते, हे योग्य नाही. विधानसभेत लक्षवेधी असली की उत्तर देण्यासाठी मंत्री महोदयांनी अभ्यास करायला हवा. लक्षवेधीवर अशाप्रकारे उत्तर देणे हा संविधानाचा अपमान आहे. 15 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यावर अजून त्याबाबत अन्न नागरी पुरवठा विभागाने कोणतीही तयारी केलेली नाही’, असे सुधीर मुनगंटीवार यांनी योगेश कदमांना सुनावले.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा