• Thu. Mar 12th, 2026

    Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा निर्णय झाला, भाजपमधून दिग्गज नेत्याचं कमबॅक होण्याची शक्यता, कोणती नावे चर्चेत?

    Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा निर्णय झाला, भाजपमधून दिग्गज नेत्याचं कमबॅक होण्याची शक्यता, कोणती नावे चर्चेत?

    Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीसाठीचे मतदान सोमवार, १६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत होणार असून याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

    राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा निर्णय झाला, भाजपमधून दिग्गज नेत्याचं कमबॅक होण्याची शक्यता(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने १० राज्यांमधील रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या ३७ जागांसाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश असून या सात जागांसाठी १६ मार्चला सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान आणि त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील संख्याबळानुसार सातपैकी सहा जागा सत्ताधारी महायुतीला मिळण्याची शक्यता आहे. या जागांसाठी आता भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये वेगवान हालचाली सुरू झाल्या असून या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक काल पार पडली. त्यानंतर आज रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचीही महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार असल्याची माहिती आहे.

    राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत राज्यसभेच्या जागेसाठी पार्थ पवार यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कोअर कमिटीच्या इतर सदस्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

    भाजप निष्ठावंतांना न्याय देणार?

    महाराष्ट्रात राज्यसभेच्या सातपैकी चार जागा भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. यातील एक जागा भाजपकडून पुन्हा एकदा रामदास आठवले यांना सोडली जाण्याची शक्यता आहे. तर इतर तीन जागांसाठी मोठी रस्सीखेंच असल्याचं दिसत आहे. यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच तावडे यांच्यासह विजया राहटकर आणि धैर्यशील पाटील यांचीही नावे स्पर्धेत आहे.

    दरम्यान, महाराष्ट्रातील डॉ. भागवत कराड, डॉ. फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, शरद पवार, धैर्यशील पाटील, रजनी पाटील आणि रामदास आठवले या सदस्यांची मुदत २ एप्रिल २०२६ रोजी संपणार असल्याने भारत निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या या सात जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणुकीची अधिसूचना गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ५ मार्च २०२६ असा आहे. या अर्जांची छाननी शुक्रवार, ६ मार्च रोजी करण्यात येईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम तारीख ९ मार्च आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळते आणि निवडणुकीचा निकाल काय लागतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा