• Fri. Mar 6th, 2026

    Kolhapur Crime: दुपारी दबक्या पावलांनी घरात घुसायची, थेट देवघराजवळ जायची अन्…; कोल्हापुरातील महिलेचा प्रताप उघडकीस, पोलिसांकडून अटक

    Kolhapur Crime: दुपारी दबक्या पावलांनी घरात घुसायची, थेट देवघराजवळ जायची अन्…; कोल्हापुरातील महिलेचा प्रताप उघडकीस, पोलिसांकडून अटक

    Kolhapur Woman Thief: महिलेच्या घराची झडती घेतली असता लक्ष्मी मूर्ती 4, गणपती मूर्ती 3, कृष्ण मूर्ती1, मारुती मूर्ती 1, दत्त मूर्ती 1, साईबाबा मूर्ती 1, स्वामी समर्थ मूर्ती 1, अन्नपूर्णा मूर्ती 1, चांदीचे टाके 2, निरंजन 3, करंडा 1, पैंजण जोड 1 आणि दिवा 1 अशा 14 मूर्तींसह साहित्य जप्त करण्यात आले.

    कोल्हापुरातील महिलेचा प्रताप उघडकीस, पोलिसांकडून अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: कोल्हापूर शहरात दुपारच्या वेळी नागरिक वामकुक्षी घेत असताना हळूच दबक्या पावलांनी घरात शिरून देवघरातील चांदीच्या मूर्ती चोरणाऱ्या सराईत महिला चोरट्याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली आहे. साने गुरुजी वसाहतीतील देवणे गल्ली येथील मानसी लक्ष्मीकांत खरे (वय 50) या महिलेच्या चौकशीतून तीन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, तिच्याकडून 3 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, पुढील तपास सुरू आहे.

    दुपारी दबक्या पावलांनी चोरीचा डाव
    मानसी खरे ही दुपारच्या वेळी (साधारण 1 ते 4 या कालावधीत) कोल्हापूर शहरातील घरी दबक्या पावलांनी शिरायची. जेवण आणि विश्रांतीच्या वेळी अनेक घरांचे मुख्य दरवाजे फक्त ओढलेले असतात. याचाच फायदा घेऊन ती घरात शिरून थेट देवघर गाठत असत. तिथे चांदीच्या मौल्यवान मूर्ती, निरंजने आणि इतर पूजेचे साहित्य लंपास करून पसार होत असे. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या या वेगळ्या चोरीच्या पद्धतीमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली होती.

    शुक्रवार पेठेतील पहिली चोरी..
    या प्रकरणाची सुरुवात 23 डिसेंबर 2025 रोजी शुक्रवार पेठेतील उदय मधुकर देवरूखकर (वय 65) यांच्या घरी झालेल्या चोरीने झाला. दुपारी उघड्या दरवाजातून शिरलेल्या चोरट्याने देवघरातील सुमारे 1 लाख 85 हजार रुपयांच्या चांदीच्या मूर्ती, सोन्याच्या किरीट आणि पाचू मणी असा ऐवज लंपास केला होता. यानंतर उत्तरेश्वर पेठेतील ज्योती किरण मगदूम (वय 43) यांच्या घरीही अशाच प्रकारची चोरी झाली. देवघरातील चांदीच्या मूर्ती आणि पैंजण जोड चोरीला गेला होता.

    सीसीटीव्ही फुटेज तपासात उलगडला गुन्हा..
    या गुन्ह्यांची नोंद झाल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा छडा लावला. गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयित महिलेची माहिती मिळाली. 21 फेब्रुवारी रोजी गुन्हे शोध पथकाने सापळा रचून मानसी खरेला ताब्यात घेतले. चौकशीत तिने तीन गुन्ह्यांची कबुली दिली.

    दरम्यान, ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ कळंत्रे, प्रीतम मिठारी, गजानन परीट, मंगेश माने, किशोर पवार आणि तानाजी देवणे यांच्या पथकाने केली. शहरात अशा प्रकारच्या चोऱ्या टाळण्यासाठी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन पोलीसांनी दिलं आहे. मानसीचा आणखी कुठल्या गुन्ह्यांशी संबंध आहे का, याचा सखोल तपास सुरू असून, तिच्या या कृत्यामुळे स्थानिक पातळीवर सुरक्षा वाढवण्याची चर्चा सुरू झाली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा