• Sat. Jun 20th, 2026
    Kalyan News : रेबीजच्या लक्षणांनी तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले; गळफास घेत आयुष्याचा शेवट, कल्याणमधील घटना

    कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लक्षणे दिसू लागल्याने मानसिक संतुलन बिघडलेल्या एका 30 वर्षीय तरुणाने गळफास लावून स्वतःला संपवले. उपचारातील हलगर्जीपणामुळे हा दुर्दैवी प्रसंग ओढवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

    श्वान चावल्यानंतर रेबीजची लक्षणे दिसू लागल्याने कल्याणमध्ये तरुणाचा टोकाचा निर्णय.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रदीप भणगे, कल्याण : श्वान चावल्यानंतर रेबीजची लक्षणे दिसू लागल्याने भ्रमिष्ठ झालेल्या एका ३० वर्षीय तरूणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रेबीजसारख्या गंभीर आजाराबाबत पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. आयश विश्वनाथ अमीन (३०) असे मृत तरूणाचे नाव असून तो कल्याण पूर्वेकडे असलेल्या तिसगाव नाका परिसरात राहत होता.

    या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तिसगाव नाका परिसरात एका भटक्या श्वानाने आयशच्या पायाचा लचका तोडला होता. श्वान चावल्यानंतर त्याने तातडीने उपचार घेणे अपेक्षित होते. मात्र त्याने केवळ एकच इंजेक्शन घेतले आणि पुढील उपचार पूर्ण केले नाहीत. गेल्या दोन-चार दिवसांपासून आयशच्या वागण्यात विचित्र बदल जाणवू लागले होते.

    पाणी पाहून भीती वाटण्यासह त्याच्या हालचाली श्वानासारख्या होत चालल्याचे आढळून आले. रेबीजचा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

    Maharashtra TimesSupreme Court OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचा पेच कायम; 22 जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवरच, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

    सुसाईड नोट लिहून जीवन संपविले

    रविवारी सायंकाळी आयश घरी एकटाच असताना त्याने टोकाचे पाऊल उचलले. गळफास घेण्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे, ज्यामध्ये आपण आत्महत्या का करत आहोत याचा उल्लेख केला आहे. या घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयाकडे पाठवून दिला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. भटक्या श्वानांचा वावर आणि रेबीजच्या लसीकरणाबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

    Maharashtra TimesDevendra Fadanvis: मैत्री, कर्तव्य, शब्दाचे पक्के अन् शेवटची पावणेतीन तासांची भेट; अजित पवारांबद्दल अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस भरभरून बोलले

    दरम्यान ही घटना अत्यंत वेदनादायक असून नागरिकांसाठी गंभीर इशारा आहे. कुत्रा चावल्यानंतर रेबिजचा धोका टाळण्यासाठी पूर्ण लसीकरण वेळेत घेणे अत्यावश्यक आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, योग्य वेळी पूर्ण उपचार घेतल्यास रेबिज पूर्णपणे टाळता येऊ शकतो. तसेच, कुत्रा चावल्यानंतर भीती, गैरसमज किंवा लक्षणांबाबत संभ्रम निर्माण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा