दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीने मंत्री आदिती तटकरे या प्रचंड भावूक झाल्या. आदिती तटकरे यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी संपूर्ण सभागृह स्तब्ध होऊन ऐकत होतं.
“ज्यावेळेला त्यांचं दुखद निधन झालं त्यावेळेला सगळेच त्यांचं कामाचं कौतुक करत होते. एक कार्यकर्ता म्हणून वाटायचं की, ते हयात असताना आम्हाला त्यांच्याबद्दल ऐकायचं होतं की त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं आहे, हे दुर्दैवाने ते नसताना आम्हाला ऐकायला मिळतंय. ती कणभर जरी प्रशंसा ते हयात असताना झाली असती तर त्यांना काम करण्याची प्रेरणा आणि प्रोत्साहन त्या निमित्ताने मिळाली असती. कारण या राज्याची सेवा करणं ही त्यांच्या इच्छा पेक्षा सवय जास्त झाली होती. त्या सवयीनुसार ते पहाटेपासून काम करायचे”, असं आदिती म्हणाल्या.
“आम्हा सगळ्यांना सांगायचे की, मंत्रालयात तीन दिवस हे तुम्ही दिलेच पाहिजेत. आम्ही सोमवारी मंत्रालयात यायचो. मंगळवार-बुधवारचे आख्खा दिवस त्यांचासोबत जायचा. त्यांच्याशिवाय काम करावी लागेल अशी भावना सुद्धा दुरान्वयेही मनाला स्पर्श करुन गेली नाही”, अशी भावना आदिती तटकरे यांनी व्यक्त केली.
“मी 2019 मध्ये ज्यावेळेला सभागृहात आली, त्यावेळेस सभागृहात कामकाज कसं करावं हे मी अजित दादांकडून शिकले. बजेट, पुरवणी मागण्या यांच्यावर कसं बोलावं या सगळ्या बारीकसारीक गोष्टी त्यांनी आम्हा सर्व तरुण आमदारांना शिकवल्या. त्यावेळी आम्हा सर्वांना ते लॉबीमध्ये घेऊन बसले. अनेक नावं घेण्यासारखे आहेत. त्यावेळी आम्हाला रात्री अकरा-बारा वाजता शेवटचं बोलण्याची संधी मिळायची. त्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत ते शेवटपर्यंत थांबायचे”, अशी आठवण आदिती तटकरे यांनी सांगितली.
“जाता-येता त्यांना कुणी विचारलं की, दादा तुम्ही अजून गेला नाहीत का? त्यावर ते म्हणायचे, नाही माझे मुलं अजून बोलत आहेत. माझ्या मुलांचं अजून सभागृहात बोलून झालं नाही. दर मंगळवारी आम्हाला भेटायचं. आमचं दर मंगळवारचं जेवण त्यांच्यासोबत असायचं. इतका दांडगा संपर्क, इतकं मार्गदर्शन इतक्या बारीकसारीक गोष्टींवर त्यांचं लक्ष असायचं, आज ती व्यक्ती आमच्यात नाही”, असं म्हणत आदिती भावूक झाल्या.
आदिती तटकरे काय-काय म्हणाल्या?
“अजित दादा यांना जावून जवळपास महिना होत आला. आम्हा सगळ्यांना कुठेतरी वाचायचं की ते आमच्यामध्ये असतील. पण तो भ्रम आज या सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर तुटला. या सभागृहावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं. आज या सभागृहात ज्यावेळेला खुर्चीवर त्यांना बघितलं नाही त्यावेळेला ही वस्तुस्थिती मान्य करुन आपल्याला आपल्या या नेत्याच्या शिवाय आयुष्य जगावं लागेल हे दुर्दैवाने आज बोलावं लागतंय. अनेकांनी माझ्या आधी अजित दादांबद्दल भावना व्यक्त केल्या. त्यांनी सर्वांनी 35 ते 40 वर्षे अजित दादांसोबत काम केलं.”
“मी 12 वर्षाची होते ज्यावेळेला मी अजित दादांना पहिल्यांदा भेटली. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. माझे वडील त्यावेळेला आमदार होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. अनेक मंडळी त्यावेळेला सहभागी झाले. त्यामध्ये माझे वडील सुनील तटकरे हे सुद्धा होते.”
“सुनील तटकरे यांच्या 13 व्या मजल्यावरच्या आमदार निवासात पहिली माझी अजित दादांची भेट झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवाहामध्ये सामील होत असताना कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकदा अजित पवार यांना पाहण्याची संधी मिळाली. लहानपणापासून अजित दादांचा सहवास राहिला. त्यावेळेला अजित दादांच्या समोर जायला भीती वाटायची. कारण त्यांचा धाक, दरारा होता.”
“अजित दादांचा जनता दरबार सकाळी पावणे सात वाजता सुरु व्हायचा. ते सकाळी साडेसहा वाजता पक्षाच्या कार्यालयात यायचे. मला राष्ट्रवादी युवती काँग्रेस संघटनेचं पद मिळालं तेव्हा त्या पदाचं नियुक्ती पत्र सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी त्यांच्या हस्ते मी स्वीकारलं. त्यादिवसापासून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळालीय.”
