म.टा. प्रतिनिधी, पुणे: ‘निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फक्त काँग्रेसनेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केले. फडणवीसांच्या ‘बुलडोझर’पुढे फक्त काँग्रेसच पाय रोवून उभी होती. त्यामुळे फडणवीस यांनी माझ्याविरोधात कुभांड रचले. मी जे बोललो नाही ते माझ्या तोंडी घालून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केला,’ असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी केला आहे.सपकाळ यांच्या प्रदेशाध्यक्षपदाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पुणे शहर काँग्रेसतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. शहराध्यक्ष अरविंद शिंदे, महापालिकेतील गटनेते ॲड. रामचंद्र ऊर्फ चंदू कदम, रमेश बागवे, मोहन जोशी, प्रशांत जगताप, दीप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, सौरभ अमराळे, अमीर शेख उपस्थित होते.
‘काँग्रेसमध्ये हिंसेला थारा नाही. मात्र, आम्हीही जशास तसे उत्तर देऊ शकतो. देवेंद्र फडणवीस तालिबानी पद्धतीने कारभार करतात. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनवर हल्ला केला, त्यादिवशी पोलिसांवर कोणाचा दबाव होता,’ असा सवाल सपकाळ यांनी केला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दबावाखाली येऊन अमेरिकेसोबत केलेल्या व्यापार करारामुळे सोयाबीन, मका, कापूस उत्पादकांना फटका बसणार आहे. त्याबाबत जागृती करण्यासाठी आम्ही राज्यात पदयात्रा काढणार आहोत,’ असेही सपकाळ म्हणाले.
‘फडणवीस औरंगजेबाप्रमाणे क्रूर, नथूराम गोडसेप्रमाणे थंड रक्ताने ‘गेम’ करणारे नेते आहेत. रेशीमबागेचा अजेंडा चालवून ‘बंच ऑफ थॉट्स’प्रमाणे त्यांना देश चालवायचा आहे. निवडणूक आयोग, पोलिस, प्रशासन त्यांच्या खिशात आहे. अशा स्थितीतही काँग्रेस त्यांच्या विरोधात उभी ठाकली. काँग्रेसला मतदारांचा प्रतिसाद मिळाला. हे पाहून देवेंद्र फडणवीस बिथरले आहेत,’ अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
‘टिपू सुलतान या संपूर्ण प्रकरणात काँग्रेसच्या एकाही कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने मला जाब विचारला नाही. सर्व जण एकसंधपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. ही नवी काँग्रेस असून, मला त्याचा अभिमान आहे,’ असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा