• Thu. Mar 12th, 2026

    मित्रांसोबत बीचवर जातोय, जयने सकाळी केलेला फोन, लाटेत वाहून गेल्याने बेपत्ता

    मित्रांसोबत बीचवर जातोय, जयने सकाळी केलेला फोन, लाटेत वाहून गेल्याने बेपत्ता

     जळगाव 

    चेन्नई येथे सॉफ्टवेअर कंपनीत इंटर्नशिपसाठी गेलेला जळगाव जिल्ह्यातील पाळधी (ता. जामनेर) येथील तरुण जय नरेंद्र पाटील (वय २१) शनिवारी समुद्राच्या लाटेत वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत जयसह इतर दोन जणही बेपत्ता असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे. मात्र, घटनेला २४ तास उलटूनही जयचा अद्याप शोध लागलेला नाही.

    चेन्नईतील कॉग्निझन्ट आयटी कंपनीमध्ये महाराष्ट्रातील १५ युवक-युवतींची इंटर्नशीपसाठी निवड झाली. येथील गोल्डन बीचवर सेल्फी घेत असताना हा अपघात झाला.

    नेमकं काय झालं?

    बी. ई. शिक्षण पूर्ण केलेला जय पाटील ५ फेब्रुवारीला चेन्नईतील नामांकित ‘कॉग्निझंट’ कंपनीत इंटर्नशिपसाठी रुजू झाला होता. शनिवारी सुट्टी असल्याने तो काही सहकाऱ्यांसोबत समुद्र किनारी फिरण्यासाठी गेला होता. या वेळी अचानक समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या आणि त्यात जयसह तीन जण ओढले गेले.

    सकाळी घरी फोनवर झालेलं बोलणं

    ही दुर्घटना घडण्यापूर्वी शनिवारी सकाळीच जयने घरी फोन करून ‘आज सुट्टी असल्याने मित्रांसोबत फिरायला जात आहे,’ असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर काही वेळातच त्याचा संपर्क तुटला. चेन्नई पोलिसांनी शनिवारी सायंकाळी जयच्या वडिलांना फोन करून या घटनेची माहिती दिली.

    आई-बहिणीपासून वृत्त लपवलं

    जयचे वडील नरेंद्र पाटील शेतकरी असून, आई शिक्षिका आहे. जयच्या बहिणीची सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. त्यामुळे घरातील वातावरण आधीच तणावाचे आहे. बहिणीच्या परीक्षेवर परिणाम होऊ नये आणि आईला धक्का बसू नये, यासाठी या घटनेची माहिती आईला अद्याप देण्यात आलेली नाही. जयचे काही नातेवाईक तातडीने चेन्नईला रवाना झाले आहेत.

    भंडाऱ्यातील तरुणीचाही मृत्यू

    चेन्नईतील गोल्डन बीचवर सेल्फी घेत असतानाच आलेल्या उंच लाटांनी समुद्रात ओढून घेतल्याने झालेल्या दुर्घटनेत भंडारा जिल्ह्यातील वरठी (भंडारा रोड) येथील एका तरुणीचाही बुडून मृत्यू झाला. मयुरी हरिश्चंद्र चौधरी असे या तरुणीचे नाव आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *