‘राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या जागेवर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी दावा केल्यानंतर आता काँग्रेसनेही या जागेसाठी शड्डू ठोकला आहे. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावे आणि राज्यसभेची जागा काँग्रेसला द्यावी, अशी थेट मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यातील सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. सध्याचे राज्यातील पक्षीय बलाबल लक्षात घेता पाच जागांवर महायुती तर एका जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येण्याची स्थिती आहे. पूर्वी शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार राज्यसभेवर निवडून गेला होता. आता मात्र, एकच उमेदवार निवडून येण्याची शक्यता असल्याने या जागेवर नेमका कोणी दावा करायचा यावर महाविकास आघाडीत खडाजंगीला सुरुवात झाली आहे.आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेच्या जागेवर शिवसेनेचा दावा सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यसभेची जागा काँग्रेससाठी मागितली. ‘महाविकास आघाडीच्या आजच्या अधिवेशनपूर्व बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार का गैरहजर राहिले, हे माहिती नाही,’ असे सपकाळ म्हणाले.काँग्रेस सध्या ‘अॅक्शन मोड’वर आहे. महापालिकेत आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, आम्ही विरोधी पक्ष म्हणून प्रभावी कामगिरी करू.-हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
‘काँग्रेसमध्ये हिंसेला थारा नाही. मात्र, आम्हीही जशास तसे उत्तर देऊ शकतो. देवेंद्र फडणवीस तालिबानी पद्धतीने कारभार करतात. भाजपच्या कार्यकत्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनवर हल्ला केला, त्यादिवशी पोलिसांवर कोणाचा दबाव होता,’ असा सवाल सपकाळ यांनी केला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दबावाखाली येऊन अमेरिकेसोबत केलेल्या व्यापार करारामुळे सोयाबीन, मका, कापूस उत्पादकांना फटका बसणार आहे. त्याबाबत जागृती करण्यासाठी आम्ही राज्यात पदयात्रा काढणार आहोत,’ असेही सपकाळ म्हणाले