• Sun. Jun 14th, 2026
    Aaditya Thackeray: राज्यसभेची ती एक जागा कुणाची? आदित्य ठाकरेंचं स्पष्ट मत, शरद पवारांचं नाव घेत म्हणाले…

    Aaditya Thackeray On Rajyasabha: अलीकडेच यातील एक जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची असल्याबाबतचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले होते.

    आदित्य ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राज्यसभेच्या राज्यातील सात जागांसाठी निवडणूक होत असून, संख्याबळानुसार यातील पाच जागा सत्ताधारी महायुतीकडे; तर दोन जागांसाठी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जोरदार लढाई होईल. यातील एक जागा शरद पवार यांच्यासाठी देण्याबाबत शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी संकेत दिले असताना याच पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मात्र या जागेवर आपल्याच पक्षाचा हक्क असल्याचा दावा शनिवारी केला.

    केंद्रीय निवडणूक आयोगाने १० राज्यांमधील रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे. त्यामुळे सध्याचे महाराष्ट्रातील खासदारांचे संख्याबळ पाहता ७ पैकी ५ जागांवर सत्ताधारी महायुतीचे खासदार विजयी होतील; तर उरलेल्या दोन जागांसाठी विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत जोरदार लढत होणार आहे; परंतु यातील एका जागेवर आपलाच हक्क असल्याचा दावा शिवसेना उबाठा पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

    Maharashtra TimesBudget Session 2026: विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांची कसोटी; सत्ताधाऱ्यांच्या कोंडीची ‘मविआ’लाही संधी, कोणते मुद्दे गाजणार?
    ‘आमच्यात वेगवेगळे मतप्रवाह नाही. आमच्या पक्षाचे स्पष्ट मत आहे, की ही जागा शिवसेना उबाठाची आहे. तुम्ही आमच्या नेते किंवा आमदार, खासदारांना विचारले तर त्या सगळ्यांचेच मत आहे की ही शिवसेना उबाठाची जागा आहे. मी कोणतीही व्यक्ती म्हणून किंवा व्यक्तीबद्दल बोलत नाही; पण आम्ही पक्ष म्हणून बोलत आहोत. सध्या महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, कोणत्या युती आणि कोणत्या आघाड्या आहेत यावरही लक्ष देणे गरजेचे आहे. एका बाजूला विलिनीकरणाचा विषय सुरू आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले तर आताच ज्या महापालिकेच्या निवडणुका होऊन गेल्या, त्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या.

    Maharashtra TimesMarathi Schools: मुंबईत मराठी शाळांची दैना! तब्बल 57 शाळा बंद पडण्याच्या वाटेवर, काय कारण?
    मुंबईतही एक राष्ट्रवादी ( शरद पवार गट) आमच्यासोबत लढली आणि एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. २०२०मध्येही एक विनंती आली होती आणि आमची जी एक जागा होती, ती आम्हाला मिळाली; परंतु आमची दुसरी जागा आम्ही राष्ट्रवादीला दिली. मात्र, २०२२ मध्ये आमचे संजय राऊत जिंकून आले; परंतु आमचे दुसरे उमेदवार संजय पवार पराभूत झाले. म्हणून सर्व राजकारण बघत असताना राज्यसभेच्या जागेवर ठाम दावा आहे’, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा