• Fri. Mar 6th, 2026
    मळणीयंत्रात केस अडकले, पुण्यात महिलेचा हृदयद्रावक अंत, वाढदिवशीच मृत्यूने गाठलं

    Pune Woman Hair Stuck in Machine : डोक्याला बांधलेला स्कार्फ आणि केस मशिनमध्ये अडकल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली होती

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    भोर : धान्य भरडण्याचे काम सुरु असताना मळणीयंत्रात स्कार्फ आणि केस अडकून महिलेचा मृत्यू झाल्याचा हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील नसरापूर-राजगड मार्गावरील कुरुंगवडी येथे शनिवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली. शुभांगी नीलेश राऊत (वय ४१) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

    नेमकं काय झालं?

    घटना घडली, त्यावेळी शुभांगी राऊत यांच्या शेतात मसूर, वाटाणा मळण्याचे काम सुरू होते. दरम्यान, त्या वाकल्या असताना डोक्याला बांधलेला त्यांचा स्कार्फ व केस मशिनमध्ये अडकले व त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने नसरापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, मोठा रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी त्यांचा वाढदिवस होता, मात्र ऐन वाढदिवशीच त्यांना मृत्यूने गाठल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

    डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

    दुसरीकडे, भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावर घडली. या प्रकरणी डंपरचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    परिमा हेमंत प्रधान (वय ३८, रा. टिळेकरनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे नातेवाइक अभिषेक निगडे (वय ३५, रा. कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी डंपरचालक संजय प्रभाकर जाधव (वय २८, रा. मानकर चौक, उरळी देवाची) याच्या विरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयासमोरच्या चौकात घडली.
    Maharashtra TimesCrime News : 58 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचा 23 वर्षीय तरुणीवर लॉजमध्ये अत्याचार, पुणे-छ. संभाजीनगरात तीन वेळा गर्भपात

    काय घडलं होतं?

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार निगडे यांची मेहुणी परिमा प्रधान सकाळी टिळेकरनगर येथून निघाल्या. त्या पुणे-सातारा रस्त्यावरून जात असताना कात्रज डेअरी चौकात भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सहायक निरीक्षक स्वप्नील पाटील तपास करीत आहेत.
    Maharashtra TimesUP Crime : 33 लहान मुलांवर अत्याचार, सिंचन विभाग इंजिनिअरसह पत्नीला मृत्युदंडाची शिक्षा, विकृती पाहून कोर्टाचा संताप

    नियम कागदावरच

    शहरातील मुख्य रस्त्यांवर दिवसा जड वाहनांना प्रवेशबंदी आहे. मात्र, डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर आदी जड वाहने पोलिसांचे आदेश धुडकावून रस्त्यावर धावताना दिसतात. सकाळी कामावर जाणाऱ्यांची वर्दळ असताना जड वाहने भरधाव बेदरकारपणे जातात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाचे नियम कागदावरच राहिले आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा