SCLR Mumbai: सांताक्रूझ-चेंबुर लिंक रोडवर पुलांची दुरवस्था झाली आहे. सीएसएमटी रोड, एलबीएस रोडवरील कुर्ला-कलिना पूल आणि टिळनगर येथील डबल डेकर उड्डाणपुलावर दुरस्तीचे काम सुरू होणार आहे.
2012 नंतर दुरुस्तीच नाही
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बांधलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड २०१२मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. एप्रिल २०१५मध्ये हा पूल मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित केला. सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड ६.४५ किमी लांब आणि ४५.७ मीटर रुंद आहे. या मार्गावर तीन उड्डाणपूल आहेत. ३.४५ किमी लांबीचा सीएसएमटी रोड उड्डाणपूल, एलबीएस मार्गावरील ५६० मीटर कुर्ला-कलिना उड्डाणपूल आणि टिळकनगर येथे डबल डेकर उड्डाणपूल आहे.
Pune News : पुण्यातील वाहतूक कोंडीवर उतारा, दोन उड्डाणपूल पाडण्याची शक्यता, दादांसोबत बैठकीत झालेली चर्चा
एक पूल लोकमान्य टिळक टर्मिनससाठी आणि दुसरा कुर्ला डेअरीसाठी, अमर महल जंक्शन उड्डाणपूल सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडला ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेशी जोडतो. या पुलांसाठी सीएसएमटी रोड, अमर महल जंक्शन, नेहरूनगर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रवेश आहे. २०१२ पासून वाहतुकीसाठी पूल खुला केल्यानंतर आजपर्यंत सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडवर कोणत्याही दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नव्हते.
पुलाला गंज चढला
रेल्वे प्रशासन आणि महापालिकेच्या एम पश्चिम वॉर्डच्या अधिकाऱ्यांनीही २०२४ मध्ये या पुलाची पाहणीही केली होती. पाहणीदरम्यान लिंक रोडवरील उड्डाणपुलांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे समोर आले. सध्याच्या उड्डाणपुलाच्या गर्डरला गेलेले तडे, पुलावरील फुटपाथची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. पुलाचे यूपीव्हीसी पाइपही तुटले आहेत. शिवाय पुलाच्या आजूबाजूला रोपटीही वाढल्याचे दिसले. तर काही ठिकाणी पुलाला गंज चढला.
Kalyan-Shilphata Metro: नव्या ‘मेट्रो 12A’ ची घोषणा, कल्याण-शिळफाटा मार्गे नवी मुंबईला जोडणार; डोंबिवली, काटई नाका… कसा असेल मार्ग?
उड्डाणपुलाच्या स्थितीचे मूल्यांकन करणेही गरजेचे असल्याने मुंबई महापालिकेने तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडून संरचनात्मक तपासणी केली जाणार होती. त्यांच्या अहवालानंतरच पुलांची मोठी दुरुस्ती करणे कितपत गरजेचे आहे, याचा अंतिम निर्णय घेण्यात येणार होता. आता पुलाची संरचनात्मक तपासणी पूर्ण झाल्याची माहिती पूल विभागातील सूत्रांनी दिली. या पुलाची दुरुस्ती करण्याचे काम प्रस्तावित आहे. त्यासाठी निविदाही काढली जाणार असल्याचे सांगितले.
काही वर्षांतच पूलाची तपासणी
उड्डाणपुलाची उभारणी केल्यानंतर नियमानुसार त्याची संरचनात्मक तपासणी ही २५ वर्षांनंतर केली जाते. ही तपासणी त्यानंतरच्या तीन, पाच वर्षांत होते. संरचनात्मक तपासणीच्या अहवालानंतरच पुलाची पुढे किती कालावधीनंतर देखभाल-दुरुस्ती आवश्यक आहे, याचा निर्णय घेतला जातो. मात्र सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडची अवघ्या काही वर्षांतच संरचनात्मक तपासणी करावी लागली. आता दुरुस्ती कामे कधी होणार, हा प्रश्नच आहे.
