मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला? याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आतापर्यंत तपास कार्यात काय-काय घडलं? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली.
“आपण सीआयडी चौकशी सुरु केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्हाला विनंती आली की, या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. शेवटी आपल्या सर्वांना सत्य कळलंच पाहिजे. मी तात्काळ केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. मी स्वत: केंद्रीय गृहमंत्र्यांशी बोललो आहे. आपण या प्रकरणी सीबीआय चौकशी करणार आहोत”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महत्त्वाची माहिती
“DGCI ने दोन प्रेसनोट दिल्या आहेत. त्यामध्ये सांगितलं आहे की, 13 निर्धारित मानकांवर चौकशी सुरु आहे. डिजीटल फ्लाईट रेकॉर्डरचा डेटा डाऊनलोड केला आहे. वाईस रेकॉर्डबाबत भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे डेटा उपलब्ध होणार नाही, अशी कोणतीही परिस्थिती नाही. ही विमाने परदेशात बनतात. त्यामुळे वाईस रेकॉर्डरचा डेटा रिकव्हर करण्यासाठी त्यांचीही मदत घेतली जात आहे. सर्व बाजूंनी चौकशी सुरु आहे”, असं फडणवीस यांनी सांगितलं.
“VSR कंपनीचं पूर्ण ऑडिट DGCA ने सुरु केलेलं आहे. केवळ अपघातानुसार हे ऑडिट चाललेलं नाही तर त्यांचं पूर्ण गेल्या काही वर्षांच्या सगळ्या फ्लाईट्सचं ऑडिट अतिशय कडक पद्धतीने करण्यात येत आहे. त्यांचे लॉगबुक्स असतील, मेंटेनन्स योग्य प्रकारे होते की नाही, याबाबत चौकशी केली जात आहे. त्यामुळे या सगळ्या चौकशीच्या निकालाची वाट बघितली पाहिजे”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
शंका असल्यास DGCA ला पत्र पाठवण्याची सूचना
“अर्थात या सगळ्या या संदर्भात कुणाच्याही मनात शंकाच असू नये, असं मी म्हणणार नाही. कुणाच्याही मनात शंका असेल तर योग्य यंत्रणेकडे ती व्यक्त केली पाहिजे. ज्यांना शंका आहे त्यांनी DGCA ला त्या शंकांबाबत पत्र लिहावं, किंवा आमच्याकडे दिलं तर आम्ही DGCA ला ते पत्र देऊ. ज्या वॅलिड शंका आहेत त्या प्रत्येक शंकेला उत्तर मिळायलाच हवं हा आमचा आणि पवार कुटुंबाचा आग्रह आहे. त्यामुळे ज्या काही शंका असतील तर तर DGCA ला पत्राद्वारे विचारले पाहिजे”, असं फडणवीस म्हणाले.
‘तपासातून समोर येणारी माहिती आमच्या सर्वांच्या जीवितासाठी महत्त्वाची’
“कोणी चौकशीची मागणी करणे चुकीचे नाही. चौकशी होतच आहे. केंद्र सरकारला आणि सिव्हिल एवीएशन डिपार्टमेंटला या चौकशीत काही लपवण्यासारखं आहे, असं मला वाटत नाही. किंबहुना आम्ही सगळे रोज त्यांच्याशी संपर्क घेऊन माहिती घेतो. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सर्व नेते विचारत आहेत. कारण यातून जी माहिती बाहेर येईल ती आमच्या सर्वांच्या जीवितासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे काही लॅपसेस असतील ते होऊ नये हे सुद्धा महत्त्वाचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘अजित दादांचा अपमान होईल असं वागू नये’
“VSR कंपनी आहे, या कंपनीच्या विमानांमध्ये देशभरातील सर्व नेते प्रवास करतात. अजित दादांचा ज्या विमानात अपघात झाला त्या विमानाने मी स्वत: प्रवास केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, या संदर्भात अपेक्षा एवढीच आहे की, शंकांचं उत्तर आपण घेतलंच पाहिजे. पण कुठल्याही पद्धतीने अजित दादांचं अपमान होईल किंवा त्यांच्या परिवाराला त्रास होईल अशा पद्धतीने कुणी वागू नये हीच माझी अपेक्षा आहे. पण कुठलेही प्रश्न विचारले पाहिजेत आणि ते योग्य ठिकाणी पोहोचले पाहिजेत”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मांडली.
