• Wed. Sep 23rd, 2026

‘पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम’ आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल; राज्यात कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Feb 22, 2026
‘पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम’ आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल; राज्यात कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान २०२६ चे वितरण
मुंबई,दि. २२ :-  राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देत आरोग्य संपन्न महाराष्ट्र  घडविण्यासाठी राज्य शासनाने आरोग्य सेवेत आणखी एक पाऊल पुढे टाकत राज्यात  ‘पॅलियेटिव्ह केअर’ कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम राज्यात प्रभावीपणे राबवावा, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रमाचा शुभारंभ, मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय लोकार्पण, वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार आणि महाआरोग्य सन्मान 2026 चे वितरण  सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास  बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर संजय घाडी, आरोग्य विभागाचे सचिव ई. रविंद्रन, आयुक्त कादंबरी बलकवडे,  संचालक डॉ. नितीन अंबाडेकर  व विजय कंदेवार, यांच्यासह  आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘उपचारांपलीकडील शासनाची साथ’ या संकल्पनेतून राज्यात पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. रूग्णांना शारीरिक वेदना नियंत्रण, मानसिक-सामाजिक आधार, कुटुंबीय समुपदेशन, घरपोच सेवा व जीवनाच्या अंतिम टप्प्यात सन्मानपूर्वक काळजी मिळावी हा’महाराष्ट्र पॅलियेटिव्ह केअर’ कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.  तसेच महिलांच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेले मेनोपॉज क्लिनिक हे महिलांच्या आरोग्य सेवेत नवा मापदंड असल्याचे त्यांनी सांगितले.


आशा स्वयंसेविकांच्या कार्याचे विशेष कौतुक करत सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.आबिटकर म्हणाले, रुग्णांशी नम्र संवाद हाच उपचाराचा पहिला टप्पा आहे. पुढील काळात राज्यातील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी   डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना आवश्यक असलेले  प्रशिक्षण देऊन त्यांची कौशल्यवृद्धी वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

पुरस्कार हे केवळ कौतुक नसून जबाबदारी वाढवणारा आणि इतरांसाठी आदर्श ठरणारा सन्मान असल्याचे सांगत  आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी पुरस्कार प्राप्त स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, पत्रकार यांचे अभिनंदन केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील जनतेला सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचेही आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले.

आरोग्यसंपन्न महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प असल्याचे  सांगत आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, रुग्णांना केवळ उपचार नव्हे, तर धीर व समाधान देणारी सेवा हीसुद्धा  आरोग्यसेवा आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र पॅलियेटिव्ह केअर’ कार्यक्रम आणि मेनोपॉज क्लिनिक राज्यात आरोग्य सेवेचे नवे मापदंड निर्माण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, 14 जानेवारीपासून राज्यातील जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महापालिका रुग्णालये तसेच निवडक ग्रामीण रुग्णालये अशा 580 ठिकाणी मेनोपॉज क्लिनिक सुरू आले आहेत.  मेनोपॉज क्लिनिकच्या माध्यमातून मातृशक्ती, स्त्रीशक्ती सक्षम व आरोग्य संपन्न करण्याचे काम होऊन ही रुग्णालये महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी महत्वाची भूमिका बजावतील. राज्यातील सामान्य नागरिकांचे आरोग्य संपन्न ठेवण्यासाठी व आरोग्य संपन्न महाराष्ट्र राखण्यासाठी आरोग्याचा ध्यास, महाराष्ट्राचा विकास हे आरोग्य विभागाचे ब्रीद वाक्य प्रत्यक्षात उतरविण्याची जबाबदारी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी व आशा स्वयंसेविकांनी पार पडावी, असे आवाहनही आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले.

या समारंभात आरोग्य दिनदर्शिका, जन्म मृत्यू नोंदणी मार्गदर्शक पुस्तिकेसह विविध प्रकाशने आणि आशा स्वयंसेविकेसाठी तयार करण्यात आलेल्या व्हिडीओचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य विभागाचे सचिव ई. रविंद्रन यांनी केले.

प्रातिनिधीक पुरस्कार यादी पाहा…

उर्वरित पुरस्कार यादी पाहा…

००००

(एकनाथशांताबाईतुकारामपोवार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed