• Fri. Mar 6th, 2026
    मंदिरामुळे चप्पल काढली, अनधिकृत बॅनर हटवताना पालिका कर्मचाऱ्याचा शॉकने मृत्यू, दोन लेकींचं पितृछत्र हरपलं, जाधव कुटुंबाचा आधार गेला

    Chhatrapati Sambhajinagar News : अमोल जाधव हे सात महिन्यांपूर्वी अनुकंपा तत्वावर सफाई कर्मचारी म्हणून महापालिकेच्या सेवेत रुजू झाले होते

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : अनधिकृतरीत्या लावलेले बॅनर काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कामगाराचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी मुकुंदवाडी परिसरातील हनुमान मंदिराजवळ घडली. यात एक मजूर गंभीर जखमी झाला. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    दरम्यान महापालिकेकडून दिलेल्या तक्रारीवरुन अनधिकृत बॅनर लावणाऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवधासह अन्य कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मृत अमोल जाधव यांचे मेहुणे महेंद्र लोखंडे यांच्या फिर्यादीवरून महापालिकेचे सुपरवायझर शिवशाम काळे, संबंधित अधिकारी व बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

    नेमकं काय घडलं?

    याप्रकरणी महापालिकेचे सहायक आयुक्त प्रसाद देशपांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी व पथक अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर हटविण्याची कारवाईसाठी मुकुंदवाडी परिसरात गेले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास मुकुंदवाडी गावातील हनुमान मंदिर परिसरातील अनाधिकृत पोस्टर, बॅनर काढण्यासाठी महापालिकेचे सफाई कर्मचारी अमोल दिनकर जाधव व रवींद्र रणधीर रिडलाँन हे गेले होते. मंदिर असल्याने चप्पल काढून ते गेले होते.

    बॅनर काढल्यावर लोखंडी भाग उच्चदाबाच्या विद्युत तारेच्या संपर्कात आला. जाधव व रिडलॉन यांना वीजेचा शॉक लागून ते दोघे भाजले. या दोघांना उपचारासाठी चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी अमोल जाधव यांना तपासून मृत घोषित केले. रवींद्र रिडलॉन यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
    Maharashtra TimesPune News : मळणीयंत्रात केस अडकले, पुण्यात महिलेचा हृदयद्रावक अंत, वाढदिवशीच मृत्यूने गाठलं

    पायात चप्पल नसल्याने मोठा धक्का

    पायात चप्पल नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेचा धक्का लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीवरुन दिपक खोतकर, प्रल्हाद गायकवाड, प्रशांत ठोंबरे, श्रीमंत गायकवाड, रघुनाथ पिपळ, स्वप्निल उर्फ सोनु, बॅनर प्रिंट करुन देणारे दुकानदार, व इतर पाच ते सात जणांविरोधात सदोष मनुष्यवधासह अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. महापालिकेचे सुपरवायझर शिवशाम काळे, संबंधित अधिकारी व बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
    Maharashtra TimesCrime News : आठवीतील सहा विद्यार्थिनींशी अश्लील चाळे, नामांकित शाळेतील शिक्षकाला अटक, महाराष्ट्र सुन्न

    जाधव कुटुंबाचा आधार गेला

    अमोल सात महिन्यांपूर्वी अनुकंपा तत्वावर सफाई कर्मचारी म्हणून महापालिकेच्या सेवेत रुजू झाले. संजयनगर गल्ली क्रमांक पाचमध्ये राहत होते. आई, वडील, पत्नी, दोन लहान मुली असा त्यांचा परिवार. घरची परिस्थिती हलाखीची, अमोल एकुलते एक होते. त्यांच्या मृत्यूमुळे जाधव कुटुंबीयांचा आधार गेला.

    Raj Thackeray | न पाहिलेली मुंबई पाहिली, शेतकरी पत्नींनी साधला राज ठाकरेंशी संवाद

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा