• Tue. Sep 22nd, 2026

पाटण येथे ‘लोकसंवाद’मधून आरोग्य योजनांची जनजागृती – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 22, 2026

चंद्रपूर, दि. २२ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूरच्या वतीने जिवती तालुक्यातील पाटण येथे ‘लोकसंवाद–२०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून नागरिकांना आरोग्य विभागाच्या विविध योजना, माता-बाल आरोग्य, लसीकरण, सिकलसेल व ॲनिमिया तपासणी, असंसर्गजन्य आजारांची तपासणी, आयुष्मान भारत तसेच गरोदर मातांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

एकता बाल गणेश मंडळाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाला पाटणचे सरपंच सिताराम मडावी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका अपेक्षा लोखंडे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, आदिवासी निरीक्षक अमोल नवलकर, गणेश मंडळाचे अध्यक्ष नारायण आत्राम, उपाध्यक्ष गजानन आत्राम, सचिव सुरेश मडावी, आशा स्वयंसेविका कविता वेडमे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी आरोग्य सेविका अपेक्षा लोखंडे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध योजना व सेवांची सविस्तर माहिती दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ‘श्री गणेशा आरोग्याचा’ हा उपक्रम राबविण्यात येत असून, नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेत नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

सिकलसेल व ॲनिमियाबाबत नियमित तपासणी आवश्यक

जिवती परिसरात सिकलसेल आणि ॲनिमियाच्या अनुषंगाने आरोग्य तपासणीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमित तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत. विशेषतः गरोदर मातांनी आरोग्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या आयर्नच्या गोळ्या नियमित घ्याव्यात. डॉक्टरांनी एखाद्या आजारासाठी औषधोपचार सुरू केल्यास तो स्वतःहून खंडित करू नये. आरोग्यविषयक कोणतीही समस्या जाणवल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अथवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी तातडीने संपर्क साधावा.

बालकांच्या आरोग्यासाठी जन्मापासून पाच वर्षांपर्यंत निर्धारित वेळापत्रकानुसार लसीकरण करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लसीकरणामुळे बालकांचे विविध आजारांपासून संरक्षण होऊन त्यांच्या सुदृढ वाढीस मदत होते. त्यामुळे पालकांनी बालकांचे कोणतेही आवश्यक लसीकरण चुकवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माता-बाल आरोग्याच्या सेवांची माहिती

कार्यक्रमात गरोदर मातांची नोंदणी, नियमित आरोग्य तपासणी, औषधोपचार, वेळोवेळी सल्ला व मार्गदर्शन, अतिजोखमीच्या गरोदर मातांना गृहभेटी व अतिरिक्त तपासण्या, लसीकरण सत्रांमधील तपासणी, संस्थात्मक प्रसूती आदी सेवांची माहिती देण्यात आली.

तसेच बालकांचे नियमित लसीकरण, गंभीर तीव्र कुपोषण (SAM) व मध्यम तीव्र कुपोषण (MAM) ओळखण्यासाठी बालकांचे वजन व उंची मोजणे, जिल्हा परिषद व आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, ‘ॲनिमियामुक्त भारत’ अंतर्गत उपाययोजना, सिकलसेल तपासणी तसेच असंसर्गजन्य आजारांसाठी (NCD) करण्यात येणाऱ्या तपासण्यांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.

आयुष्मान व आभा कार्ड काढण्याचे आवाहन

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना निर्धारित निकषांनुसार उपचारासाठी आरोग्य संरक्षणाचा लाभ मिळतो. त्यामुळे पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांच्या आधारे आयुष्मान कार्ड तयार करून घ्यावे. यासोबतच नागरिकांनी आपले आभा (ABHA) कार्ड तयार करून डिजिटल आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

गरोदर मातांसाठीच्या योजनांची माहिती

गरोदर माता व बालकांसाठी शासनाच्या विविध योजनांतर्गत उपलब्ध लाभांचीही यावेळी माहिती देण्यात आली. यामध्ये जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत उपलब्ध मोफत आरोग्य सेवा, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, बुडीत मजुरी संदर्भातील लाभ तसेच आदिवासी मातांसाठी उपलब्ध मातृत्वविषयक योजनांचा समावेश होता.

यावेळी आदिवासी विकास विभागामार्फत योजनांवर आधारित चित्ररथही परिसरात फिरवण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी, तर आभार सरपंच सिताराम मडावी यांनी मानले.

00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed