Daund Crime: हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भागवत याचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्या हत्येनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी परिसर सील करून आरोपींचा शोध सुरू केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास भागवत हा आपल्या मित्रांसह दुचाकीवरून पाटसकडे जात होता. मुकदमवाडी उड्डाणपुलावर पाठीमागून आलेल्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर ते खाली पडताच हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी भागवतवर वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. गंभीर जखमी झालेल्या भागवतचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी महेश मारुती टुले यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आनंद माकर, विकी शितकल, संतोष शितकल (रा. आंबिकानगर, पाटस) यांच्यासह दोन अज्ञात व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक आरोपींचा शोध घेत आहे.
विशेष म्हणजे, ४ जुलै २०२१ रोजी पाटस येथील तामखडा भागात शिवम शितकल आणि गणेश माकर या दोघांची हत्या झाली होती. त्या प्रकरणात महेश भागवत याच्यासह काही जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता आणि ते जामिनावर मुक्त होते. त्यामुळे सध्याच्या घटनेचा त्या जुन्या प्रकरणाशी संबंध आहे का, याबाबत विविध तर्कवितर्क सुरू आहेत.
दरम्यान कुरकुंभजवळ झालेल्या या हल्ल्यात जुन्या प्रकरणातील आणखी दोघे जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे. घटनेनंतर पाटस व परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून संभाव्य तणाव टाळण्यासाठी खबरदारीची पावले उचलण्यात आली आहेत.
