• Mon. Mar 9th, 2026

    सहलींचे स्वस्त पॅकेज महागात! आकर्षक जाहिरातींची भुरळ; तिकीट, रिसॉर्ट, व्हिला बुकिंगच्या नावाने फसवणूक

    सहलींचे स्वस्त पॅकेज महागात! आकर्षक जाहिरातींची भुरळ; तिकीट, रिसॉर्ट, व्हिला बुकिंगच्या नावाने फसवणूक

    Travel Scam Alert: हॉलिडे पॅकेजमध्ये सवलत देण्याचे प्रलोभन दाखवून आर्थिक लुबाडणूक केली जात आहे. त्यामुळे फिरायला जाण्याचे बुकिंग करताना सावध राहायला हवे.

    मुंबई फसवणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    दिपेश मोरे, मुंबई : दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. पाठोपाठ शाळांमधील इतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होतील. त्या संपताच उन्हाळी सुट्ट्यांना सुरुवात होईल. त्यामुळे नातेवाईक, मित्रमंडळी, मुलांना सोबत घेऊन फिरायला जाण्याचे बेत आखले जात आहेत.

    ऐनवेळी पंचाईत होऊ नये म्हणून आतापासूनच ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. ही संधी साधत कमी दरात तिकीट, रिसॉर्ट, व्हिला, हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना मुंबईत समोर येत आहेत.

    ६० जणांची ३३ लाखांची फसवणूक

    विलेपार्ले येथील एका क्लबमध्ये बहुतांश सदस्य हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांनी आपल्या कुटुंबासह आसाम आणि मेघालय येथे जाण्याचे ठरविले होते. यातील काही जण राहुल जैन असे नाव सांगणाऱ्या हॉलिडे प्लॅनरच्या संपर्कात आले. क्लबच्या सदस्यांनी राहुल याची भेट घेतली. राहुल याने पॅकेजची माहिती देत प्रत्येकी ७५ हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. यामध्ये प्रवास, राहणे, खाणे आणि प्रेक्षणीय स्थळांना भेटी यांचा समावेश असल्याचे राहुल याने सांगितले.

    Maharashtra TimesMarathi Schools: मुंबईत मराठी शाळांची दैना! तब्बल 57 शाळा बंद पडण्याच्या वाटेवर, काय कारण?
    केज परवडणारे असल्याने सर्वांनी यासाठी होकार दिला. राहुल याने रक्कम तीन टप्प्यांत देण्यास सांगितले. त्यानुसार ६० सदस्यांनी मिळून ३३ लाख रुपये राहुल याला पाठवले. मात्र तिकीट, हॉटेल बुकिंग याबाबत काहीच माहिती मिळत नसल्याने सदस्यांनी त्याच्याकडे विचारणा केली. मेघालय आणि आसाममध्ये मुसळधार पाऊस असल्याने पॅकेज रद्द करावे लागणार असल्याचे सांगत राहुल याने धनादेश दिले. मात्र हे धनादेश बाउन्स झाल्यानंतर सर्वांनी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार केली.

    विदेशवारीच्या नावाखाली गंडा
    काळाचौकी येथे राहणाऱ्या एका गारमेंट व्यावसायिकाने २० जणांसह थायलंड येथे फिरायला जाण्याचे ठरविले. यासाठी परिचयातील असलेल्या अमित आणि अभिसत्यम झा या दोन एजंटशी संपर्क साधला. त्यांनी एका व्यक्तीचे ५५ ते ५७ हजार रुपये होतील, असे सांगितले. सवलत देऊन सर्वांच्या पॅकेजसाठी नऊ लाख ८० हजारांचा खर्च सांगण्यात आला. यामध्ये विमानाचे तिकीट, फिरणे, खाणे आणि राहणे यांचा समावेश होता. व्यावसायिकाने यासाठी होकार देत सर्व रक्कम पोहोच केली. मात्र अमित आणि अभिसत्यम यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने अधिक माहिती घेतली असता, दोघांनी त्यांचे बुकिंगच केले नसल्याचे समोर आले.

    Maharashtra TimesMantralaya Bribe Case: गाडे यांचे नाव का लपवले? FDA लाचखोरी प्रकरणात तक्रारदारांचा आक्षेप
    पाच हजारांसाठी पावणेतीन लाखांवर पाणी
    मुलुंडला राहणाऱ्या व्यावसायिकाला कुटुंबीयांसमवेत पुणे येथे फिरायला जायचे होते. यासाठी त्यांनी एका अॅपवरून हॉटेल बुकिंग केले. हॉटेलचे साडेपाच हजार भाडे त्यांनी गुगल पेद्वारे भरले. यानंतर त्यांना एक मेल आला. त्यामध्ये बुकिंग झाले नसल्याचे नमूद केले होते. पैसे जाऊनही बुकिंग न झाल्याने त्यांनी अॅपचा कस्टमर केअर क्रमांक शोधला. वरील प्रतिनिधीने व्यावसायिकाला एक लिंक पाठवली आणि त्यात तपशील भरण्यास सांगितले. तसेच, पैसे परत मिळविण्यासाठी डेबिट कार्डवरून दहा रुपये भरण्यास सांगितले. व्यावसायिकाने लिंकवर तपशील भरून दहा रुपये पाठवताच त्यांच्या बँक खात्यामधून पावणेतीन लाख रुपये परस्पर वळविण्यात आले.

    Maharashtra TimesSharad Pawar: …तरच शरद पवार राज्यसभेवर जाणार! तेव्हा माढाचा पाढा अन् आता सुटेना तिढा; गणित कुठे अडकलं?
    हे लक्षात असू द्या…
    -हॉलिडे पॅकेजच्या जाहिरातींची प्रथम शहानिशा करा.
    -अधिकृत आणि विश्वासार्ह कंपनीतर्फेच बुकिंग करावे.
    -टूर ऑपरेटरची निवड करण्यापूर्वी नोंदणी प्रमाणपत्र, विश्वासार्हता तपासा.
    -बनावट एजंट सवलतींचा वर्षाव करून फसवणूक करतात.
    -ऑनलाइन पेमेंट करण्यापूर्वी, सुरक्षित वेबसाइट आणि अॅप वापरा.
    -कोणत्याही बनावट लिंकवर क्लिक करू नका.
    -खात्री पटण्यापूर्वी पूर्ण रक्कम भरू नये.
    -फसवणूक झाल्यास त्वरित पोलिसांत तक्रार करावी.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा