महामार्गावरुन जाणाऱ्या गाड्या अडवून लुटमार करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा नाशिक पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे केरळमध्ये जावून पोलिसांनी आरोपींच्या नांग्या ठेचल्या आहेत. तिथे मिळालेल्या माहितीच्या आधारावर नाशिक-सिन्नर मार्गावर धबा धरुन बसलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी रंगेहात पकडलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. केरळमधून येऊन महाराष्ट्रात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या 12 सराईत गुन्हेगारांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर या टोळीकडून तब्बल 19 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये वाडी-वऱ्हे परिसरात एका स्कॉर्पिओ गाडीला अडवून, प्रवाशांच्या डोळ्यांत काहीतरी टाकून साडेचार लाखांची लूट या टोळीकडून करण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपींची बोलण्याची भाषा आणि शरीरयष्टीवरून ते केरळमधील असल्याचे निष्पन्न झाले होते.
नाशिक पोलिसांनी थेट केरळ गाठून दोन संशयित आरोपी बाबु व्ही. आर. रमन पिल्ले (वय ५४), आकाश एस. कांत श्रीकांत (वय १८) यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली की, ही टोळी पुन्हा नाशिकमध्ये मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे.
आरोपींची चौकशी करून त्यांच्या इतर साथीदारांबाबत माहिती घेतली असता, ते पुन्हा नाशिक जिल्ह्यात लुटमार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात गेले असल्याचे त्यांनी सांगितले. या माहितीची खात्री केली असता, त्यांचे साथीदार हे महामार्गावरील वाहनांची लुट करण्याच्या उद्देशाने सिन्नर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गालगत चारचाकी वाहनांमध्ये दबा धरून थांबलेले असल्याची खात्री झाली.
यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि सिन्नर पोलिसांचे पथकांनी संयुक्तपणे छापा टाकून यातील नियास मुहम्मद अली (वय २६), मुहम्मद आदिल अब्दुल माजिद (वय २५), अनिलकुमार करूणाकरा कुरूप (वय ४७), सबरीनाथ विनु के. व्ही (वय २४), आसिफ हमीद (वय ४०), अब्दुल हमीद नासर (वय ३४), शहारूख पी.एस. शहाजहान (वय २६), सिरल बाबु मजिद (वय ४०), अरुणकुमार के. (वय ४४), सबीश व्ही. एस. संतोष (वय ४०), यांना ताब्यात घेतले आहे. तर इतर ०५ साथीदार हे फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी या संशयितांकडून लोखंडी तलवारी, कोयते, टोकदार चाकू आणि मिरची पूड तसेच टोयोटा एटीओस, मारुती स्विफ्ट आणि होंडा सिटी यांसारख्या 4 महागड्या गाड्या असा एकूण 19 लाख 55 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने महाराष्ट्रच नव्हे तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा