काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या भिवंडी न्यायालयात हजर होणार आहेत. विशेष म्हणजे ते आज उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर येथे न्यायालयात हजर राहीले होते. त्यानंतर ते उद्या भिवंडी न्यायालयात हजर राहणार असल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीत २०१४ मध्ये भिवंडीतील प्रचार सभेत राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध आरएसएसचे राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. या प्रकरणात राहुल यांना कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर जामीनदार होते. चाकूरकर यांचे गेल्यावर्षी निधन झाल्याने राहुल यांना नवीन जामीनदार द्यावा लागणार आहे. त्यामुळे आज ते न्यायालयात उपस्थित राहून नवीन जामीनदार देतील, अशी माहिती त्यांचे वकील नारायण अय्यर यांनी दिली. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने अद्याप जामीनदाराचे नाव जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे राहुल यांना कोण जामीनदार राहिले आहे, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.
विशेष म्हणजे राहुल गांधी हे शुक्रवारी (20 फेब्रुवारी) उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर येथे दाखल झाले होते. सुल्तनापूरच्या एमपी-एमएलए कोर्टात ते हजर झाले होते. यानंतर सलग दुसऱ्या दिवशी त्यांना कोर्टात हजर राहावं लागलणार आहे. पण यावेळी त्यांना कोर्टात हजर राहण्यासाठी सुल्तानपूरहून भिवंडीत यावं लागणार आहे. ते उद्या कोर्टात हजर राहणार असल्याची माहिती आहे.
राहुल गांधी यांच्या भिवंडी दौऱ्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. राहुल गांधी भिवंडीत कोर्टाचं काम आटोपल्यानंतर कुणाला भेटतात, पक्षाच्या नेत्यांसोबत काय चर्चा करतात, आगामी काळासाठी काही रणनीती ठरवतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे. भिवंडी महापालिका निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. इथे भाजपला धक्का देत काँग्रेसने भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांनी पाठिंबा देत महापौर निवडणुकीत विजयी केले. त्यानंतर उपमहापौरही काँग्रेसचा बसला. या निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी भिवंडीत जात आहेत. त्यामुळे भिवंडी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये राहुल गांधी यांच्या भेटीने नवी ऊर्जा मिळण्याची शक्यता आहे.
