Sharad Pawar: राज्यसभेच्या ७ जागांसाठी मार्चमध्ये निवडणूक होणार आहे. भाजप प्रणित महायुतीकडे असलेलं संख्याबळ त्यांच्या ६ जागा सहज निवडून येतील. तर मविआला एक जागा जिंकता येईल.
राज्यसभेवर जाण्यासाठी ३७ मतांची गरज आहे. सध्या महाविकास आघाडीकडे एकूण ४६ मतं आहेत. यात शिवसेना उबाठाची २०, काँग्रेसची १६ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची १० मतं आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय चर्चेत आहे. याबद्दल शरद पवारांच्या पक्षानं भूमिका स्पष्ट करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. राष्ट्रवादी शपची भूमिका स्पष्ट झाल्यावर राज्यसभेवर चर्चा होईल, असा पवित्रा काँग्रेसनं घेतला आहे. त्यामुळे पेच कायम आहे. मविआच्या भरवशावर निवडणूक लढवायची झाल्यास शरद पवारांसाठी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरते.
Maharashtra Rajya Sabha Election: शहांचा फडणवीसांना फोन, सगळेच अवाक्, बरीच शोधाशोध अन् नाव ठरलेलं; यंदा राज्यसभेवर कोणाकोणाला संधी?
संसदीय राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत शरद पवारांनी २ वर्षांपूर्वी दिले. पण आता परिस्थिती बरीच बदलली आहे. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर परिस्थितीचा मोठा फरक पडला आहे. अशा परिस्थितीत शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्याचा विचार करु शकतात. शरद पवारांची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी जिंकण्याचा विषय कठीण नाही. स्वत:च्या पक्षाचे १०, ठाकरेसेनेचे २० आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या अतिरिक्त मतांच्या जोरावरही ते राज्यसभा गाठू शकतात. अशा परिस्थितीत त्यांना काँग्रेसच्या मतांची गरज नसेल.
शरद पवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले तर निवडणूक बिनविरोध होईल. किंबहुना निवडणूक बिनविरोध होणार याची खात्री पटल्यावरच शरद पवार रिंगणात उतरतील. शरद पवार गेल्या ५९ वर्षांपासून संसदीय राजकारणात आहेत. विधिमंडळात २७ आणि संसदेत ३२ वर्षांपासून ते सक्रिय आहेत. या कालावधीत ते एकही निवडणूक हरलेले नाहीत. ते दोनदा राज्यसभेवर गेले आहेत. विशेष म्हणजे त्या दोन्ही वेळा राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झालेली आहे. २०१४ आणि २०२० मध्ये शरद पवार राज्यसभेवर गेले. त्यावेळी निवडणूक बिनविरोध पार पडलेली होती.
शरद पवारांनी राज्यसभा निवडणूक लढवायची ठरवली तर विजयाची खात्री असल्याशिवाय ते अर्ज भरणार नाहीत. २०१९ मध्ये शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढायची तयारी केली होती. पण तिथल्या स्थानिक नेत्यांनी पवारांविरोधात फिल्डींग लावली. माढा शरद पवारांना पाडा, असा पवित्रा घेतला गेला. ही घोषणा पवारांच्या कानापर्यंत आली. त्यानंतर त्यांनी माढ्यातून लढण्यास नकार दिला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळे बारामतीतून, तर पार्थ पवार मावळमधून लढत होते.
एकाच कुटुंबातून ३-३ उमेदवार नको, असं म्हणत पवारांनी माढ्यातून माघार घेतली. पण माढा शरद पवारांना पाडा ही घोषणा त्या माघारीमागे होती, अशी चर्चा त्यावेळी झाली. विजयाची खात्री असल्याशिवाय मैदानात उतरायचं नाही. उतरायचं ते जिंकण्यासाठीच, हा शरद पवारांचा मंत्र आहे. त्यामुळेच आता राज्यसभेच्या निवडणुकीत पवार काय करणार ते पाहणं महत्त्वाचं असेल.
