• Sun. Mar 15th, 2026

    मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य पदयात्रा व सांस्कृतिक कार्यक्रम

    ByMH LIVE NEWS

    Feb 19, 2026
    मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य पदयात्रा व सांस्कृतिक कार्यक्रम

    मुंबई, दि. १९ : सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देण्यासाठी तसेच शौर्यगाथेवर आधारित सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी भव्य पदयात्रा (रॅली) व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान भव्य पदयात्रा काढण्यात आली. देशभक्तीपर घोषणा, ढोल-ताशांचा गजर आणि शिवगर्जनेने परिसर दुमदुमून गेला.

    जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे पद्मश्री पुरस्कार विजेते मलखांब प्रशिक्षक उदय देशपांडे, मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल व अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच विविध महाविद्यालये व शाळांतील शिक्षक उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी कार्यालय ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान भव्य पदयात्रा काढण्यात आली. गेट वे ऑफ इंडिया येथे विविध सांस्कृतिक सादरीकरण, शिवरायांच्या जीवनावर आधारित प्रयोगात्मक कला व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

    सेंट अॅण्ड अॅन्स गर्ल हायस्कूल, चिराबाजार यांच्याकडून लेझीम सादरीकरण तर सेंट पॉल गर्ल कॉन्वेंट हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी बँड पथकाचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर केले. दत्तात्रय म्हात्रे, विजय करजावकर व हेमंत भाताडे यांनी शिवचरित्रावर आधारित पोवाड्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

    श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर यांच्यावतीने मल्लखांबाची थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या समूहात चार अंध विद्यार्थी व 16 इतर विद्यार्थी-विद्यार्थिनींसह प्रशिक्षकांनी सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी केली.

    लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आखाडा यांच्याकडून रणमैदानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले.

    बी.पी.सी.ए. कॉलेज, वडाळा यांच्या 88 विद्यार्थ्यांच्या झांज पथकाने वातावरण भारावून टाकले.

    याशिवाय विविध शाळा व महाविद्यालयांतील एनएसएस, एनसीसी आणि स्काऊट-गाईडचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    खेळाडूंचा सत्कार व रक्तदान शिबीर

    मुंबई शहर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या विविध खेळाडूंचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच शिवजयंती निमित्त सर ज. जे. समूह रुग्णालय यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

    या कार्यक्रमाला मुंबई शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील एकूण 625 विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. यावेळी अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी आभार मानले.

    ०००

    शैलजा पाटील/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *