• Fri. Mar 6th, 2026
    Rohit Pawar : ‘अजितदादांच्या मृत्यूमागे व्यापक कट’, रोहित पवारांकडून पुन्हा शंका उपस्थित; म्हणाले…

    Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash : ‘व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंह यांचा मुलगा रोहित सिंह यांच्या लग्नात अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यात तेलुगू देसम पक्षाच्या नेत्यांचाही समावेश होता. त्यामुळेच प्रकरणाचा तपास संथगतीने होत आहे का’, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.

    रोहित पवारांची अजित पवारांच्या अपघातावर शंका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, पुणे : ‘माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या विमानातून प्रवास केला, ते व्हीएसआर कंपनीचे होते. त्या कंपनीचे मालक आणि तेलुगू देसम पक्षाचे चांगले संबंध आहेत. सध्याचे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हे त्याच पक्षाचे असल्याने विमान अपघात प्रकरणात निष्पक्ष तपास होईल का, याची शंका आहे. त्यामुळेच मंत्री के. राममोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार रोहित पवार यांनी बुधवारी केली. तसेच, ‘अपघाताला 20 दिवस उलटूनही या घटनेचा प्राथमिक अहवालही न आल्याने या काळात खोटी कागदपत्रे तयार केली तर जात नाही ना’, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

    विमानात इंधनटाक्या पूर्ण का भरल्या?

    28 जानेवारी रोजी सकाळी बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. हा अपघात नसून घातपातच असल्याचा दावा रोहित पवार यांनी 10 फेब्रुवारी रोजी केला होता. आता त्यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेत व्हीएसआर कंपनी, नागरी उड्डाण वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) यांच्याविषयी शंका उपस्थित केली. ‘मुंबई ते बारामती या कमी अंतराच्या प्रवासासाठी विमानात इंधनटाक्या पूर्ण का भरल्या होत्या, तसेच विमान पडल्यानंतर ज्या पद्धतीने स्फोट झाले ते पाहता अतिरिक्त इंधन साठविण्यात आल्याची शक्यता आहे’, असे ते म्हणाले.
    Maharashtra TimesPune Bhigwan Kidnapping Case: मी मर्जीने पळून आले; भिगवणमधील मुलीचा व्हिडिओ समोर, पण त्यांनी तो व्हिडिओ…; गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

    वैमानिक सुमित कपूर यांची पार्श्वभूमी वादग्रस्त

    ‘अपघातग्रस्त विमानाचे वैमानिक सुमित कपूर यांची पार्श्वभूमी वादग्रस्त होती. 12 ते 13 लाख रुपये मासिक वेतन असलेल्या कपूर यांना मद्यपानामुळे आधीची नोकरी सोडावी लागली आणि व्हीएसआरमध्ये महिना दोन ते तीन लाख रुपयांची नोकरी स्वीकारावी लागली. कपूर यांना अपघातग्रस्त विमान लिअरजेट चालविण्याचाही फारसा अनुभव नव्हता. तसेच अतिशय नाजूक कौटुंबिक अडचणही होती. त्यामुळे या सर्वांचा फायदा घेत त्यांना विमान आदळविण्यास लावले की सुमारे 50 कोटी रुपयांच्या विम्याच्या रकमेसाठी हे झाले, याचा शोध घ्यायला हवा’, असेही पवार म्हणाले.

    ‘चौकशी समितीस 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत होती. तरीही अद्याप अहवाल का नाही, व्हीएसआर कंपनीला खोटी कागदपत्रे आणि पुरावे तयार करण्यासाठी ही मुभा देण्यात येते का’, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. ‘अपघाताची चौकशी निष्पक्ष होण्यासाठी देशाबाहेरील दोन एजन्सीची मदत घेण्याची आणि देशाचे या तपासावर लक्ष ठेवण्यासाठी आणि देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पवार कुटुंबातील आणि पक्षातील प्रतिनिधी व तज्ज्ञांची समिती नेमण्यात यावी’, अशी मागणीही त्यांनी केली.
    Maharashtra TimesPune Budhwar Peth : पोलिसांचा बुधवार पेठेत पुन्हा छापा, 11 बांग्लादेशी ताब्यात, सहा जणांची कबुली; पेठेत नक्की काय घडलं?

    ‘दीडशेपट ताकद कुठे गेली’?

    ‘आजच्या राजकारणात निवडणूक लढविण्यासाठी मार्गदर्शक प्रमाणपत्र आणि ‘कागदांची’ आवश्यकता असते. मोठी निवडणूक असेल तर ‘मार्गदर्शक कागद’ जास्त लागतात. दादांचा हा अपघात होण्यापूर्वी या ‘कागदां’चे नियोजन स्वतः ते करत होते. अपघाताच्या दिवशी मार्गदर्शक ‘कागदां’चे नियोजन झाले होते. या मार्गदर्शक ‘कागदां’च्या माध्यमातून येथे दोनशेपट ताकद लावण्याचा निर्णय झाला होता. परंतु अपघात झाल्यानंतर केवळ 50 पटच ताकद लावण्यात आली. त्यामुळे पक्ष जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकांत कमकुवत झाला. दीडशेपट ताकद कोणी व का कमी लावली’, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा