मुंबई
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी मुलुंड येथील जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर निर्माण झालेला वाद अद्याप शमलेला नसतानाच आता मालाड पश्चिमेतील मालवणी येथील मुक्तेश्वर भागातील ११८ एकर जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे (डीआरपी) हस्तांतरित करण्यात आली आहे. या भूखंडामुळे धारावीमध्येच इन सिटू पद्धतीने पुनर्वसनासाठी अपात्र ठरणाऱ्या रहिवाशांना मालाडमध्ये स्थलांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मालवणीमधील हा भूखंड ‘डीआरपी’ला प्राप्त झाल्याने ‘एनएमडीपीएल’कडून (नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि.) या ठिकाणी पुनर्वसनाच्या उद्देशाने इमारतींचे नियोजन, बांधकाम प्रक्रिया सुरू होऊ शकते.
‘डीआरपी’च्या अखत्यारीत मालवणीतील ११८ एकरचा विशाल भूखंड येत आहे. कुर्ला येथील मदर डेअरी आणि मुलुंड मिठागरापाठोपाठ ‘डीआरपी’ला पुनर्वसनाच्या अनुषंगाने तिसरा मोठा भूखंड प्राप्त झाला आहे. मालवणी येथे धारावीतील झोपड्यांच्या वरच्या मजल्यांवरील रहिवाशांसह १ जानेवारी २०११नंतर आणि १५ नोव्हेंबर २०२२पूर्वी धारावीमध्ये स्थायिक झालेल्या पात्र नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. ‘डीआरपी’तील अटी, शर्तींनुसार या रहिवाशांना महानगर प्रदेशातील सुनियोजित वसाहतींमध्ये घरे देण्यात येतील. मात्र, या भूखंडाचा मालकी हक्क डीआरपी-एसआरएकडे राहणार असून विकास हक्क ‘एसपीव्ही’कडे राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्य शासनाने डीआरपीअंतर्गत परवडणाऱ्या आणि उत्तम घरांच्या निर्मितीसाठी मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ५४० एकर जमीन उपलब्ध केली आहे. त्यात कुर्ला, कांजुरमार्ग, भांडुप, मुलुंड येथील मिठागरांच्या जागेसह देवनार डम्पिंगच्या काही भागांचा समावेश आहे. त्या ठिकाणी पुनर्वसनाचा उद्देश पूर्ण होणार आहे. या ठिकाणी पुनर्विकासाची प्रक्रिया टप्पाटप्प्यात पूर्ण होणार आहे. या ठिकाणी पात्रतेनुसार पुढील सात वर्षांच्या कालावधीत धारावीकरांना नवीन घरांमध्ये स्थलांतरित करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे १० लाख रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी सुमारे सव्वा ते दीड लाख एवढी नवीन घरे बांधली जाणार आहेत.
डम्पिंग, डेअरी, मिठागर…
धारावी पुनर्विकासातील अपात्र झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी देवनार डम्पिंग ग्राऊंडची १२५ एकर जागा यापूर्वीच देण्यात आली आहे. या डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावर बायोमायनिंगद्वारे प्रक्रिया करून तीन वर्षांत डम्पिंग रिकामे केले जाणार आहे. देवनार डम्पिंगची एकूण जागा २३५ एकर आहे. अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी यापूर्वीच कुर्ला, कांजुरमार्ग-भांडुप-मुलुंड येथील जमीनही देण्यात आलेली आहे. यात कुर्ला डेअरीची २१ एकर आणि मिठागरांची २५५ एकर जागा आहे.
२२ एकर जमीन न्यायालयीन प्रक्रियेत
मालवणीतील ११८ एकर जमिनीची एकूण किंमत सुमारे ५४० कोटी रुपये एवढी आहे. त्यापैकी १३५ कोटी रुपये विकास हक्कांचा प्रीमियम म्हणून ‘एनएमडीपीएल’कडून यापूर्वीच देण्यात आले आहेत. तसेच, उर्वरित रक्कम तीन हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहे. मालवणीतील मुक्तेश्वर येथील १४० एकर जमीन राखीव ठेवण्यात आली असून, त्यातील ११८ एकर जमीन ‘डीआरपी’कडे देण्यात आली आहे. शिल्लक २२ एकर जमीन न्यायालयीन प्रक्रियेत आहे.