• Fri. Mar 20th, 2026
    NCP Meger: राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेत खासदार अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले ’14 बैठका झाल्या…’

    दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. रोहित पवारांनी अमोल कोल्हेंच्या प्रदेशाध्यक्षपदाचा दावा केला असतानाच, प्रफुल्ल पटेलांनी विलीनीकरणाला स्पष्ट नकार दिला आहे.

    दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यतेवर अमोल कोल्हेंचा नवा दावा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेने सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. आमदार रोहित पवार यांनी विलीनीकरणाबाबत केलेल्या एका दाव्यामुळे चर्चेला सुरुवात झाली, मात्र काही तासांतच खासदार प्रफुल्ल पटेल यांनी या शक्यता फेटाळून लावल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

    नेमका दावा काय?

    आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास खासदार अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याचे नियोजित होते. या विलीनीकरणासाठी आजवर अनेक बैठका झाल्याचेही त्यांनी नमूद केले. खासदार अमोल कोल्हे यांनीही एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याला दुजोरा दिला आहे. विलीनीकरणासंदर्भात झालेल्या एकूण १४ बैठकींपैकी ११ बैठकांना आपण उपस्थित होतो, असे कोल्हे यांनी स्पष्ट केले. यामुळे विलीनीकरणाच्या चर्चा केवळ प्राथमिक स्तरावर नसून त्याबाबत पडद्यामागे हालचाली सुरू होत्या, हे समोर आले आहे.

    पक्षांतर्गत मतमतांतरे

    या विलीनीकरणाबाबत अजित पवार गटातील नेत्यांमध्ये मात्र मतभिन्नता दिसून येत आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अलीकडेच सांगितले होते की, जर विलीनीकरणाचा लेखी प्रस्ताव आला, तर त्यावर चर्चा करता येईल. मात्र, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना विलीनीकरणाची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. पटेलांच्या या भूमिकेमुळे विलीनीकरणाच्या प्रक्रियेला ब्रेक लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

    Maharashtra TimesMaharashtra Politics: मोठी उलथापालथ! भाजपला झटका, नगरसेवकांचा काँग्रेसला पाठिंबा; सत्ता पेच सुटला, समीकरणं फिरली

    आमदारांचा गट संपर्कात?

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या गटातील सुमारे १२ आमदार सध्या शरद पवार यांच्या गटाच्या संपर्कात आहेत. या आमदारांची दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र यावेत अशी इच्छा असल्याचे समजते. मात्र, आमदारांच्या या इच्छेविरुद्ध पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी विलीनीकरणाला नकार दिल्याने या आमदारांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Maharashtra TimesRaj Thackeray: राज ठाकरे ‘नंदनवना’त, दादूसोबतच्या युतीनंतर पहिल्यांदाच शिंदेंची भेट; ‘लवचिक’ भूमिकेचे संकेत?
    दरम्यान, रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांच्या दाव्यांमुळे विलीनीकरणाची चर्चा अधिक गडद झाली असली, तरी प्रफुल्ल पटेल यांच्या नकारामुळे या प्रक्रियेत पेच निर्माण झाला आहे. आगामी काळात दोन्ही पक्ष एकत्र येणार की ही चर्चा केवळ चर्चाच राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा