• Tue. Mar 10th, 2026

    मोठी उलथापालथ! भाजपला झटका, नगरसेवकांचा काँग्रेसला पाठिंबा; सत्ता पेच सुटला, समीकरणं फिरली

    मोठी उलथापालथ! भाजपला झटका, नगरसेवकांचा काँग्रेसला पाठिंबा; सत्ता पेच सुटला, समीकरणं फिरली

    Maharashtra Politics: भिवंडी महापालिकेत मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. भाजपच्या २२ पैकी ९ नगरसेवकांनी काँग्रेस आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे समीकरणं बदलली आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे: भिवंडी महापालिकेतील सत्ता समीकरणं अचानक बदलली आहेत. १६ जानेवारीला महापालिका निवडणुकीचा निकाल लागला. निकाल लागून महिना उलटला तरीही भिवंडीत सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. त्यातच आता शहरात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. भाजप नगरसेवकांच्या एका गटानं काँग्रेस , राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भिवंडीत काँग्रेस आघाडीचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसच्या तिरक्या चालीनं भाजपला धक्का बसला आहे.

    भिवंडी महानगरपालिका निवडणुकीचा निकाल गेल्या महिन्यात जाहीर झाला. मतदारांनी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिलं नाही. काँग्रेसला सर्वाधिक ३० जागा मिळाल्या. भाजपनं २२ जागा जिंकल्या. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला प्रत्येकी १२ जागांवर समाधान मानावं लागलं. भिवंडी महानगरपालिकेतील एकूण सदस्यसंख्या ९० आहे. बहुमतासाठी ४६ चा आकडा गाठणं गरजेचं आहे. भाजपच्या ९ नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यानं काँग्रेस आघाडीचं संख्याबळ ५० च्या पुढे गेलं आहे.

    काँग्रेस आणि राष्ट्रवादी शप यांचा एकत्रित आकडा ४२ पर्यंत पोहोचला. त्यांना सत्ता स्थापनेसाठी आणखी ४ नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक होता. त्यातच आता भाजपच्या २२ पैकी ९ नगरसेवकांनी काँग्रेस प्रणित भिवंडी सेक्युलर फ्रंटला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेस प्रणित आघाडीनं बहुमताचा आकडा गाठला आहे. येत्या दोन दिवसांत आघाडीचा महापौर बसेल, अशी शक्यता आहे.

    गेल्या महिन्याभरापासून भिवंडीत विवि राजकीय समीकरणांची चर्चा होती. भाजप, शिंदेसेना यांचं एकत्रित संख्याबळ ३४ पर्यंत पोहोचतं. त्यामुळे त्यांना सत्ता स्थापनेसाठी आणखी १२ जणांचा पाठिंबा गरजेचा होता. पण काँग्रेस आघाडीनं भाजपला धक्का दिला. भाजपच्या ९ नगरसेवकांनी सेक्युलर फ्रंटला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे काँग्रेस आघाडीनं बहुमताचा आकडा गाठला आणि भाजपला जोरदार धक्का बसला.

    भिवंडी महापालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा?
    भाजप- २२
    शिंदेसेना- १२
    ठाकरेसेना- ०
    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार- १२
    राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार- ०
    काँग्रेस- ३०
    अन्य पक्ष- १३
    अपक्ष- १

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा