• Sat. Mar 7th, 2026

    अपहरणाचा विषय तापलेला असताना ‘त्या’ तरुणीचा VIDEO समोर; भिगवण प्रकरणात ट्विस्ट, पडळकर आक्रमक

    अपहरणाचा विषय तापलेला असताना ‘त्या’ तरुणीचा VIDEO समोर; भिगवण प्रकरणात ट्विस्ट, पडळकर आक्रमक

    Pune Girl Kidnapping Case: पुण्यातील भिगवणमधील तरुणीच्या अपहरण प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. अपहरण झाल्याचा दावा करण्यात आल्याचा तरुणीचा व्हिडीओ समोर आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    – दीपक पडकर

    पुणे: भिगवणमधील तरुणीच्या अपहरणाचं प्रकरण गाजत असताना त्यात एक मोठा ट्विस्ट आला आहे. काल संध्याकाळी चारच्या सुमारास तरुणीचं दोन तरुणांनी अपहरण केलं. तरुणी तिच्या लग्नाची खरेदी करुन आई, भावासोबत घरी परतत होती. त्यावेळी दोन तरुणांनी मुलीच्या आणि भावाच्या डोळ्यांमध्ये मिरचीपूड टाकली. यानंतर त्यांनी तरुणीचं अपहरण केलं. या प्रकरणी हिंदुत्त्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत भिगवण बंदची हाक दिली. अपहरण झालेली तरुणी, आरोपी तरुण पोलिसांना अद्याप सापडलेला नाही. पण त्या तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालं आहे.

    संबंधित तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये तिने स्वतःच्या इच्छेने तरुणासोबत गेल्याचे स्पष्ट केले आहे. “माझे आणि त्याचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. त्याने मला कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केलेली नाही. मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत निघून आले आहे,” असं स्पष्टीकरण संबंधित तरुणीनं दिलं आहे. त्यामुळे हे सगळं प्रकरण अपहरणाचं आहे की प्रेम प्रकरणाचं असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तरुणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांकडून तिचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिचे वय, नातेसंबंधांची पार्श्वभूमी आणि कुटुंबियांच्या तक्रारीच्या अनुषंगाने कायदेशीर बाबींची पडताळणी केली जाणार आहे.

    गेल्या महिन्याभरात तरुणी आणि तरुणाचे २१ कॉल्स झाल्याची माहिती सीडीआरच्या माध्यमातून पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्या तरुणावर अपहरणाचे आरोप झाले आहेत, त्याचं घर तरुणीच्या घरापासून अवघ्या १०० मीटरवर आहे. दोघेही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. अपहरणाला २४ तास उलटून गेले आहेत. पोलिसांच्या सहा पथकांकडून त्यांचा शोध सुरु आहे.

    या प्रकरणी हिंदुत्त्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तरुणीला लवकरात लवकर शोधण्याची आणि तरुणाला अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी भिगवण पोलीस ठाणं गाठून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तरुणीचा व्हिडीओ तिच्यावर दबाव टाकून तयार करण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केला. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या गर्दीशी संवाद साधला. पोलिसांसोबत झालेल्या चर्चेची माहिती त्यांना दिली.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा